लिंगपिसाट फ्रेडीचा ब्रिटिश साथीदार वार्लीच्या प्रत्यार्पणासाठी दबाव
By Admin | Updated: September 23, 2014 02:21 IST2014-09-23T02:17:45+5:302014-09-23T02:21:56+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न : आरोपीचा स्वत: ‘डिमेन्सिया’ग्रस्त असल्याचा कांगावा

लिंगपिसाट फ्रेडीचा ब्रिटिश साथीदार वार्लीच्या प्रत्यार्पणासाठी दबाव
मडगाव : ७0 ते ८0 च्या दशकात मडगावात अनाथाश्रम स्थापून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप असलेला लिंगपिसाट फ्रेडी पिटस् याचा इंग्लिश साथीदार रेमंड वार्ली याच्यावर खटला चालविण्यासाठी त्याला भारतात येण्याची परवानगी द्यावी, यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढू लागला आहे. या आरोपीने आपण ‘डिमेन्सिया’ या विकाराने ग्रस्त असल्याने भारतात जाण्याचा ताण सहन करू शकणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
फ्रेडीच्या या साथीदाराला गोव्यात आणून त्याच्यावर खटला चालविण्यासाठी सीबीआयचा खटाटोप चालू आहे. मात्र, ब्रिटिश न्यायालयाने रेमंड हा डिमेन्सियाग्रस्त असल्याचे कारण पुढे करून त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी भारत सरकारने केलेला अर्ज फेटाळला होता.
७0 ते ८0 या दशकात आरोपी वार्ली आपल्या अन्य विदेशी साथीदारांसह फ्रेडीच्या फातोर्डा-मडगाव येथील गुरुकुल या अनाथाश्रमाला भेट देऊन तिथे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच आरोपाखाली १९९0 मध्ये फ्रेडी पिटस्वर खटला चालवून होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ही शिक्षा भोगत असतानाच फ्रेडीचे तुरुंगातच निधन झाले होते.
याच प्रकरणात फ्रेडीच्या अन्य दोन विदेशी साथीदारांना सक्तमजुरीची शिक्षा झाली होती, तर सेबिरे डॉमिनिक या फ्रेंच साथीदाराला अटक करूनही त्यानंतर मिळालेला जामीन घेऊन तो गोव्यातून फरार झाला होता.
एका बाजूने वार्ली याने आपण ‘डिमेन्सिया’चा रुग्ण असल्याचा दावा केला असला तरी त्याच्या या दाव्याला बळी पडू नये यासाठी आॅनलाईन मोहीम सुरू झाली आहे. विवियन बॉप्तिस्ता या ब्रिटिश महिलेने यासाठी ‘चेंज डॉट आॅर्ग’ या नावाचे संकेतस्थळ उघडले असून, रेमंडचे भारतात प्रत्यार्पण करावे यासाठी ब्रिटनसह भारत, न्यूझिलंड आणि आखाती देशातील नागरिकांनी या संकेतस्थळावर आपली मते नोंद केली आहेत.
हा आरोपी दोषी असल्यामुळेच आपले प्रत्यार्पण होऊ नये यासाठी त्याची धडपड चालू आहे. मात्र, अत्याचारीत लहान मुलांना न्याय द्यायचा असेल तर त्यांचे प्रत्यार्पण झालेच पाहिजे, असे मत विवियन यांनी व्यक्त केले आहे. या मताला जगभरातील सुमारे २00 नागरिकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. गोव्यात कित्येकवेळा पर्यटक म्हणून आलेले ग्लॅडिस कॅटन या ब्रिटिश नागरिकाने आपल्या संकेतस्थळात म्हटले आहे की, एक पालक व आजोबा या नात्याने सर्व लहान मुलांना सांभाळले पाहिजे, या मताचा मी आहे. पर्यटक म्हणून गोव्यात मी कित्येकदा आलो आहे. येथे सापडणारी मुले किती निरागस असतात याची मला जाणीव आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पूजा सायका यांनी आपल्या संदेशात प्रत्येक मुलाला अत्याचाररहित जीवन जगण्याचा हक्क आहे आणि असे अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, असा आग्रह धरला आहे. आपल्या या प्रयत्नांना जगातून पाठिंबा मिळेल अशी विवियन यांना आशा आहे. वार्लीचे भारतात प्रत्यार्पण व्हावे यासाठी तिने स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही प्रयत्न चालू केले आहेत. (प्रतिनिधी)