लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पावसाळा जवळ आल्याने सध्या स्मार्ट सिटी पणजीत मॉन्सूनपूर्व कामांना गती दिली आहे. ही कामे आता अंतिम टप्प्यात सुरू असून, लवकरच ती पूर्ण होतील, असे पणजी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाळयात नागरिकांना कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी शहरात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली. या कामांसाठी अतिरिक्त कामगार मनपाने नियुक्त केले असून सध्या काही कामे मीरामारमध्ये सुरू आहेत. स्मार्ट सिटी योजनेतील कामांमुळे गेल्यावेळी मान्सूनपूर्व कामांना विलंब झाला होता. त्यातून शहरवासियांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते.
या कामांवर भर
दरम्यान, या कामांमध्ये शहरातील गटारांतील कचरा स्वच्छ करणे, गळ उपसणे, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी आदी कामांचा समावेश आहे. जेणेकरून पावसाळ्यात फांद्या घरांवर, वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर पडून अनुचित घटना घडू नये, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी पावसाळ्यात चर्च चौक परिसरात मोठे झाड कोसळले होते. रस्त्यावर चालत जाणाऱ्या एका युवतीच्या अंगावर पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. राजधानीतील बहुतांश भागात मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली आहे.
दोन महिने आधीच
पावसाळा जवळ येत असल्याने आणि स्मार्ट सिटीच्या कामांचा व्याप पाहता महानगरपालिकेतर्फे मान्सूनपूर्व कामांना आधीच गती दिली. दोन महिने आधीच या कामाला महानगरपालिकेने प्राधान्य दिले आहे.
एप्रिल महिन्यात मिरामार, सांतिनेझ, पाटो, मळा, व आल्तिनो या भागातील मान्सूनपूर्व कामे होती घेण्यात आली होती. या दरम्यान गटारांची सफाई करण्यात आली. गटारांमध्ये असलेला गाळ काढण्यात आला. सेंट्रल पणजीत सध्या ही कामे सुरु आहेत.
धोकादायक झाडे किंवा फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. अखेरच्या टप्प्यादेखील पुन्हा या सर्व भागात थोडीफार कामे केली जाणार आहेत, जेणेकरुन पणजीत पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही.