चित्रीकरणामुळे रुग्णांना त्रास
By Admin | Updated: November 23, 2015 02:26 IST2015-11-23T02:26:08+5:302015-11-23T02:26:19+5:30
मडगाव : हॉस्पिसिओ इस्पितळ रविवारच्या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आले. या इस्पितळात एका तामिळ चित्रपटाचे शुटिंग

चित्रीकरणामुळे रुग्णांना त्रास
मडगाव : हॉस्पिसिओ इस्पितळ रविवारच्या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आले. या इस्पितळात एका तामिळ चित्रपटाचे शुटिंग चालू होते. याचा त्रास रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सोसावा लागला. त्यात भर म्हणून तेथे चित्रीकरणात व्यत्यय येऊ नये म्हणून तैनात केलेल्या बाउन्सरच्या दादागिरीलाही रुग्णांना सामोरे जावे लागले. रविवारच्या या घटनेचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून कडक शब्दांत निषेध केला आहे. काहीजणांनी आपली कैफियत हॉस्पिसिओतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितली. मात्र, चित्रपटाचे शुटिंग सांयकाळी संपेपर्यंत याची कुणीच दखल घेतली नाही. शेवटी शुटिंगचा संपूर्ण बाडबिस्तारा हॉस्पिसिओतून निघून गेल्यानंतर रुग्णांनी व त्यांच्याबरोबर असलेल्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला.
उपलब्ध माहितीनुसार, पणजी येथील शिवाबाबा नाईक नावाच्या एका व्यक्तीने या चित्रपट शुटिंगसाठी आरोग्य खात्याचे अवर सचिव व्दितीय यांच्याकडे लेखी परवानगी मागितली होती. हॉस्पिसिओचे मुख्य प्रवेशव्दार तसेच आवारात सकाळी सात ते सांयकाळी सात वाजेपर्यंत शुटिंगसाठी ही परवानगी मागितली होती. शुटिंगसाठी त्यांना परवानगीही देण्यात आली होती. मात्र शुटिंग हॉस्पिसिओच्या आतही चालू झाल्याने त्याचा जाच रुग्णांना सोसावा लागला.
दुपारी हॉस्पिसिओतून कुणालाही बाहेर जाण्यासही बाउन्सर्स मज्जाव करू लागले. त्यातच या बाउन्सर्सना केवळ तामिळ भाषा अवगत असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासही रुग्णांच्या नातेवाईकांना अडचण झाली. काहींनी हा प्रकार हॉस्पिसिओतील अधिकाऱ्यांनाही सांगितला. मात्र, त्यातून काही साध्य होऊ शकले नाही. शेवटी सायंकाळी शुटिंग संपल्यानंतरच स्थिती पूर्वपदावर आली. (प्रतिनिधी)