पोर्तुगिजांनी गोव्याची माफी मागावी : ढवळीकर
By Admin | Updated: January 16, 2016 01:55 IST2016-01-16T01:51:46+5:302016-01-16T01:55:23+5:30
पणजी : मूळ गोमंतकीय असलेले आंतोनिओ कॉस्ता हे पोर्र्तुगालचे पंतप्रधान बनल्यामुळे त्यांना गोव्यात निमंत्रित करून त्यांचा

पोर्तुगिजांनी गोव्याची माफी मागावी : ढवळीकर
पणजी : मूळ गोमंतकीय असलेले आंतोनिओ कॉस्ता हे पोर्र्तुगालचे पंतप्रधान बनल्यामुळे त्यांना गोव्यात निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्याच्या सूचनेबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी विधानसभेत पूर्ण अनुकूलता दर्र्शविली. तथापि, म.गो. पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यापूर्वीचा इतिहास नजरेसमोर ठेवून पोर्र्तुगालने गोव्याची माफी मागावी, अशी मागणी केली.
कॉस्ता यांचे अभिनंदन करणारा ठराव कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मांडला होता. तो ठराव सभागृहाने मंजूर केला. कॉस्ता यांना आपण भेटलो होतो. त्या वेळी ते पंतप्रधान नव्हते. तथापि, ते पंतप्रधान होतील, असे लोकांना त्या वेळीच वाटत होते. त्यांची क्षमताच तशी आहे. कॉस्ता यांना गोवा सरकारने येथे बोलावून त्यांचा सन्मान करायला हवा; कारण ते मूळ गोमंतकीय आहेत, असे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा म्हणाले. कॉस्ता यांच्यासह अन्य जे गोमंतकीय पोर्र्तुगालमध्ये उच्चपदी पोहचले आहेत, त्यांनाही निमंत्रित करून गौरवावे, असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे म्हणाले.
पोर्तुगिजांनी आमच्यावर राज्य केले, हा इतिहास उगाळत न बसता आम्ही पोर्तुगालशी गोव्याचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध दृढ करावेत, असे उपसभापती विष्णू वाघ म्हणाले. पोर्तुगालच्या गोव्यावरील ४५० वर्षांच्या राजवटीत काही गोष्टी चांगल्याही घडल्या, असे प्रमाणपत्र दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी दिले. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी नंतर गुदिन्हो यांच्या या वक्तव्याशी असहमती दर्र्शविली. पोर्तुगिजांनी गोव्यावर केलेले राज्य व गोव्याची केलेली हानी विसरणे शक्य नाही. पोर्तुगालने खरे म्हणजे गोव्याची माफी मागायला हवी; कारण पोर्र्तुगीज आले नसते, तर आमचा आणखी जास्त विकास झाला असता, असे ढवळीकर म्हणाले. एक गोमंतकीय व्यक्ती उच्चपदी पोहचली एवढ्यापुरतेच आपण कॉस्ता यांचे अभिनंदन करतो, असेही ढवळीकर म्हणाले. विजय सरदेसाई, ग्लेन टिकलो, सभापती अनंत शेट आदींनी कॉस्ता यांचे अभिनंदन केले. (खास प्रतिनिधी)