पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले, हा इतिहास पूर्ण खोटा!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 10:40 IST2025-02-20T10:39:52+5:302025-02-20T10:40:49+5:30
फर्मागुडी येथे शिवजयंती थाटात साजरी

पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले, हा इतिहास पूर्ण खोटा!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले असा खोटा इतिहास आम्हाला आजवर शिकवला गेला. खरे तर पोर्तुगीजांकडे केवळ सासष्टी, तिसवाडी व बार्देश हे तीनच प्रांत होते. उर्वरित संपूर्ण गोव्यात शिवशाही राज्य करत होती. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर जेमतेमच ९० वर्षे त्यांनी संपूर्ण गोव्यावर राज्य केले असेल. हा इतिहास आजच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे फर्मागुडी येथे बुधवारी आयोजित शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, नगराध्यक्ष आनंद नाईक, वेलिंग सरपंच दीक्षा सतरकर, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव रमेश वर्मा, संचालक दीपक बांदेकर उपस्थित होते. सुरुवातीला फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्यास आदरांजली वाहण्यात आली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वयाच्या २७व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वतःचे नौदल सिंधुसागरात उभारून, समुद्र सत्तेतील पोर्तुगीजांच्या एकाधिकारशाहीला धक्का दिला. पोर्तुगीजांविरुद्ध गोव्यात सामाजिक व राजकीय कारणासाठी जाब विचारणारा पहिला भारतीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण गोमंतकात हिंदवी स्वराज्याची राजकीय सत्ता असावी या हेतूने त्यांनी पोर्तुगीजांना नामोहरम करून सोडले होते.
बार्देशमध्ये प्रत्येक जुलमी धर्मातरांचा फतवा काढताच त्यांच्यावर आक्रमण करून यापुढे गोव्यात धर्मातर होणार नाही, असा तह करून घेतला. त्यामुळेच गोमंतकाचा आजचा ७० टक्के भाग हा हिंदवी स्वराज्याचा भाग असल्यासारखे वाटते. त्यांनी विदेशी धार्मिक आक्रमकांनी मोडलेल्या हिंदूच्या मंदिराचे पुनर्निर्माण केले. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊनच आमचे सरकार आज उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुन्हा उभारणी करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपक बांदेकर यांनी स्वागत केले तर नरेंद्र तारी यांनी प्रास्ताविक केले. उपसंचालक गणेश बर्वे यांनी आभार व्यक्त केले.
संभाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला जातोय. संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमणे केली ती हिंदूंच्या रक्षणासाठी. गोव्याला पोर्तुगीजाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी केलेली ती आक्रमणे होती. पूर्ण साडेचारशे वर्षे पोर्तुगीज राज्य येथे असते तर त्यांनी शंभर टक्के धर्मांतरण केले असते. शिवशाही राहिली म्हणून धर्मांतरण रोखले गेले. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
आपल्या जीवनावर सम्राट अशोक व छत्रपती शिवाजी महाराज यांचा खूप प्रभाव आहे. राजकारण व समाजकारण करत असताना या दोघांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवतो. आजच्या मुलांनी त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करावा. - सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री.
शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्यासाठी अनेकांचे बलिदान कामी आलेले आहे. आजच्या तरुणांनी शिवचरित्राचा अभ्यास करायला हवा. स्वराज्यसाठी हिंदूंबरोबर मुस्लीमबांधवानाही जीव गमावला. - गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री.