पणजी : उत्तर गोव्यातील चॅरिटी होममध्ये एका कर्मचाऱ्यानेच पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण गाजू लागल्यानंतर पोलीस आता चौकशीच्या कामास लागले आहेत. यापूर्वी जे चौकशी काम झाले नाही किंवा ज्या त्रुटी राहिल्या, त्याबाबत विचार करून कायद्यानुसार आम्ही पुढील पावले उचलू, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. लंडनस्थित एका चॅरिटी होममध्ये बलात्काराची घटना घडली व त्यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. हे चॅरिटी होम चालविणारे जोडपे हे मूळ लंडनमधील आहे. गेल्या एप्रिलमध्ये बलात्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यास जुने गोवे पोलिसांनी अटक केली असली, तरी या जोडप्याचा शोध घेण्याचा मात्र प्रयत्न केला नाही. चॅरिटी होम बंद करून जोडप्याने पळही काढला. आरोपी लगेच जामिनावर सुटला व पोलिसांच्या दृष्टीनेही तो विषय संपला. मात्र, आता प्रसारमाध्यमांनी या विषयी आवाज उठवल्यानंतर पोलीस नव्याने कामाला लागले आहेत. डीआयजी व्यास यांना बुधवारी याविषयी विचारले असता ते म्हणाले की, पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कलमे लागू केली होती. तथापि, न्यायालयाने जामीन दिला. या प्रकरणाचा नव्याने आम्ही आढावा घेऊ व चॅरिटी होम बंद करून गेलेल्या जोडप्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. कायद्याच्या चौकटीत राहून जे काही करणे शक्य आहे ते केले जाईल. न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केल्यानंतर त्यास आव्हान का दिले गेले नाही, त्यावेळची स्थिती काय होती, हेही आम्ही जाणून घेऊ. पोलीस कुठे कमी पडले का, हे पाहिले जाईल. तथापि, पोलिसांनी लावलेली कठोर कलमे पाहता पोलिसांचे काम समाधानकारक वाटते. दरम्यान, सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याने आता उत्तर व दक्षिण गोव्यासाठी असलेल्या बाल कल्याण समित्यांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यमान समित्यांचा कार्यकाळ येत्या डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. त्या वादग्रस्त चॅरिटी होमने यापूर्वी नोंदणीसाठी अर्ज केला होता, तो अर्जही खात्याने फेटाळून नोंदणी नाकारली. खात्याने चॅरिटी होम चालविणाऱ्या व्यवस्थापनास कारणे दाखवा नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलावले होते; पण कुणीच आले नाही. (खास प्रतिनिधी)
‘चॅरिटी होम’प्रकरणी पोलीस तपासाला वेग
By admin | Updated: September 4, 2014 01:20 IST