मिकींच्या शोधासाठी पोलीस कॅसिनोत!
By Admin | Updated: April 14, 2015 23:59 IST2015-04-14T23:59:01+5:302015-04-14T23:59:15+5:30
मडगाव : न्यायालयाने अटक वॉरन्ट जारी करून पाच दिवस उलटले, तरीही माजी मंत्री मिकी पाशेको हाती न लागल्यामुळे शेवटी पोलिसांनी कॅसिनोही

मिकींच्या शोधासाठी पोलीस कॅसिनोत!
मडगाव : न्यायालयाने अटक वॉरन्ट जारी करून पाच दिवस उलटले, तरीही माजी मंत्री मिकी पाशेको हाती न लागल्यामुळे शेवटी पोलिसांनी कॅसिनोही धुंडाळले. कदाचित पाशेको यांनी कॅसिनोचा आसरा घेतला असावा, अशी शक्यता गृहीत धरून पोलीस पथकाने गोव्यातील अनेक कॅसिनोंना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, मंगळवारी आंबेडकर जयंतीची सुट्टी असल्याने पाशेकोंची पुनर्विचार याचिका सोमवारीही सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर येऊ शकली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत सध्या ठाण मांडून असलेल्या पोलीस पथकाने दिल्लीतील सुमारे १२ ते १५ हॉटेलात जाऊन चौकशी केली. या हॉटेलातील रजिस्टर त्यांनी तपासून पाहिले. त्यासाठी दिल्लीतील टिळक मार्ग पोलिसांचेही त्यांनी सहकार्य घेतले. दिल्लीला गेलेले हे पथक गोवा निवासमध्ये थांबले असून दिल्लीतील डिस्कोथेकमध्येही ते पाहणी करणार आहेत.
गोव्यातील पोलिसांनी कॅसिनोतही तपासणी केली, या वृत्ताला मडगावचे पोलीस अधीक्षक मोहन नाईक यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, पाशेको यांचा तपास लावण्यासाठी आम्ही दोन पोलीस पथकांची स्थापना केली आहे. त्यापैकी एक पथक दिल्लीत जाऊन शोध घेत असून दुसरे पथक गोव्यात त्यांचा शोध घेत आहे. पाशेकोंच्या घराबरोबरच त्यांच्या मित्रांच्या जागा, एवढेच नव्हे, तर कॅसिनोही आम्ही धुंडाळून पाहिले आहेत. दिल्लीत गेलेले पथकही त्यांचा शोध घेत आहे. पाशेको ज्या ज्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे, ती सर्व ठिकाणे पोलिसांनी पिंजून काढली आहेत, असे त्यांनी सांगितले.
गोवा पोलीस पाशेकोंचा दिल्लीत व गोव्यात शोध घेत असले, तरी त्यांना वालंकिणी येथे पाहिले, अशा आशयाची अफवा दोन दिवसांपूर्वी गोव्यात पसरली होती; पण त्याची खात्री करून घेण्यासाठी पोलिसांनी फारशी तसदी घेतलेली नाही.
(प्रतिनिधी)