येत्या महिन्यापासून कालबद्ध सेवा हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 03:05 IST2017-03-28T03:05:28+5:302017-03-28T03:05:38+5:30
पणजी : येत्या महिन्यापासून राज्यात कालबद्ध सेवा हमी कायदा पूर्णपणे अमलात आणला जाणार आहे. तसेच महसूल खात्याच्या अखत्यारित

येत्या महिन्यापासून कालबद्ध सेवा हमी
पणजी : येत्या महिन्यापासून राज्यात कालबद्ध सेवा हमी कायदा पूर्णपणे अमलात आणला जाणार आहे. तसेच महसूल खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून कर्मचाऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे.
महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी सोमवारी उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मामलेदार, संयुक्त मामलेदार आदींची पर्र्वरीतील सचिवालयात सोमवारी सायंकाळी संयुक्त बैठक घेतली. कामचुकार कर्मचाऱ्यांना यापुढे थारा नसेल, लोकांची कामे जलदगतीने व्हायला हवीत, ज्यांना भ्रष्टाचार करायचा असेल व कामच करायचे नसेल त्यांनी आताच स्वेच्छा निवृत्ती पत्करण्याची तयारी करावी, असे मंत्री खंवटे यांनी बैठकीवेळी बजाविले. लोकांना ठराविक कालावधीत सेवा मिळावी म्हणून सर्व व्यवस्था सरकार करील. येत्या तीन महिन्यांत याबाबत शंभर टक्के यश मिळायला हवे व याची अंमलबजावणी येत्या महिन्यापासून सुरू होईल, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
लोकांना म्युटेशनसह अन्य कामांसाठी वेळ लागू नये. साधे दाखले, प्रमाणपत्रे जलदगतीने मिळायला हवीत. त्यासाठी संगणकीकृत प्रशासन सर्व स्तरांवर मार्गी लावावे, अशी सूचना मंत्री खंवटे यांनी अधिकाऱ्यांना केली. झिरो टॉलरन्स टू करप्शन असे लिहिलेले फलक सर्व मामलेदार, उपजिल्हाधिकारी व अन्य कार्यालयांमध्ये लावले जातील. लोकांना ई-मेलद्वारे तक्रारी करण्याची व्यवस्था केली जाईल व त्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे मंत्री खंवटे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. लोक कामे लवकर व्हावीत म्हणून दूरवरून येत असतात. लोकांप्रती अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशील बनावे, असे अपेक्षित आहे, असे खंवटे म्हणाले. तीन महिन्यांत सेवा हमी कायदा पूर्णपणे अमलात येईल, त्याची सुरुवात येत्या महिन्यात होईल, असे ते म्हणाले.
(खास प्रतिनिधी)