लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : माणूस जीवनात पैसा, प्रतिष्ठा सर्वकाही कमवतो. पण, मनाची शांती मात्र त्याच माध्यमातून मिळवू शकत नाही. ही मनःशांती केवळ संगीतात व नामस्मरणात आहे. पं. अजित कडकडे हे सदैव गायन न नामस्मरणात मग्न असतात. त्याचमुळे त्यांच्यातील उर्जा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यांना गोमंत विभूषण पुरस्कार लाभणे ही बाब डिचोली तालुक्यासाठी महान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केले.
साखळी रवींद्र भवन व स्व. रामा अर्जुन पारोडकर ट्रस्टतर्फे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या पं. अजित कडकडे यांच्या संगीत मैफलीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पं. अजित कडकडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, ज्येष्ठ कलाकार प्रभाकर मळीक, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, संचालक अतुल मळीक, सातू माईणकर, शशिकांत नार्वेकर, श्याम गावस, शोधन कोळमुळे, स्नेहा देसाई, रवीराज च्यारी, पारोडकर ट्रस्टचे संदीप पारोडकर आदींची उपस्थिती होती.
व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ कलाकारांच्या हस्ते पं. अजित कडकडे यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल वेर्णेकर यांनी केले.
कलेप्रती समर्पण, आत्मियतेमुळेच कडकडे महान कलाकार : शेट्ये
पं. अजित कडकडे हे ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांचे कलेप्रती समर्पण व आत्मियता याच जोरावर संगीत कलेत मोठी प्रतिष्ठा मिळवून त्यांनी आपल्यासह डिचोलीचे नाव प्रसिद्ध केले आहे, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये सांगितले.
अभिषेकी माझे गुरु : कडकडे
पं. जितेंद्र अभिषेकी हे आपले गुरु असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घडलो. त्यांच्यासमोर आपणास पंडित ही पदवी योग्य वाटत नाही. ती पदवी केवळ पं. जितेंद्र अभिषेकी यांचीच आहे. आपणास कृपया पंडित या पदवीने हाक मारू नये, असे यावेळी पं. अजित कडकडे यांनी म्हटले. यावेळी त्यांची संगीत मैफल रंगली.