पटिदार यांच्यावर महिनाभरात आरोपपत्र
By Admin | Updated: August 7, 2014 01:20 IST2014-08-07T01:18:49+5:302014-08-07T01:20:57+5:30
वासुदेव पागी ल्ल पणजी चार वर्षांपूर्वी लाच घेताना पकडलेले सहकारी बँकेचे माजी निबंधक आणि प्रोव्हेदोरियाचे संचालक पी. के. पटिदार यांचे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविलेल्या

पटिदार यांच्यावर महिनाभरात आरोपपत्र
वासुदेव पागी ल्ल पणजी
चार वर्षांपूर्वी लाच घेताना पकडलेले सहकारी बँकेचे माजी निबंधक आणि प्रोव्हेदोरियाचे संचालक पी. के. पटिदार यांचे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविलेल्या आवाजाच्या नमुन्याच्या अहवालात पोलिसांनी रेकॉर्ड केलेला आवाज हा पटिदार यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पटिदार यांना ३० जून २०१० रोजी पणजी येथील सहकारी भवनात त्यांच्या निबंधक कार्यालयात कंत्राटदाराकडून १५ हजार रुपये घेताना पकडले होते. एकूण २.३ लाख रुपयांची लाच त्यांनी मागितली होती. पकडलेली रक्कम हा पहिला हप्ता होता. भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या (एसीबी) सापळ्यात ते अडकले होते. त्या वेळी लाच घेताना कंत्राटदार (तक्रारदार) आणि पटिदार यांच्या संवादाचे छुप्या कॅमऱ्याद्वारे रेकॉर्डिंग केले होते. तसेच १५ हजार रोख रुपये जे पटिदार यांना दिले होते. त्यावर एसीबीकडून विशिष्ट पावडर लावली होती. ती त्यांच्या हाताला लागल्यामुळे पाण्यात हात घातल्यावर पाण्याला विशिष्ट रंग चढला होता. त्यानंतर संवाद रेकॉर्डिंगचे तसेच पाण्याचे नमुने हैदराबाद येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत चाचणीस पाठविले होते. पाण्याच्या नमुन्याचा म्हणजे रासायनिक अहवाल यापूर्वीच आला होता. त्यात पटिदार दोषी ठरले होते; परंतु पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी संवाद चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. तो ही मिळाल्याने पटिदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला. महिनाभरात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाईल, असे सूत्रांकडून समजले. आठवड्यात या चाचणीचा अहवाल एसीबीला मिळाला आहे.
शेतकऱ्यांना पशुखाद्य पुरविणाऱ्या एका कंत्राटदाराला त्यांचे २३ लाख रुपयांचे बिले देण्यासाठी त्याच्याकडे पटिदार यांनी दहा टक्के रुपये, म्हणजे २.३ लाख रुपये लाच मागितली
होती. कंत्राटदाराने याची माहिती दक्षता
खात्याला दिली होती. दक्षता खात्याचा अंमलबजावणी विभाग असलेल्या एसीबीकडून सापळा रचून पटिदार यांना पैसे घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता.
पटिदार पकडले गेले तेव्हा त्यांना सेवेतून निलंबित केले होते; परंतु नंतर त्यांचे निलंबन मागे घेतले होते. सध्या ते प्रोव्हेदोरियाचे संचालक आहेत.