पार्सेकर-सुदिन राजकारणात अडली ‘जुवारी’ची पायाभरणी
By Admin | Updated: December 9, 2015 02:11 IST2015-12-09T02:11:14+5:302015-12-09T02:11:23+5:30
पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्लीस जाऊन १४ डिसेंबर ही तारीख जुवारीवरील नव्या

पार्सेकर-सुदिन राजकारणात अडली ‘जुवारी’ची पायाभरणी
पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्लीस जाऊन १४ डिसेंबर ही तारीख जुवारीवरील नव्या पुलाच्या पायाभरणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मान्य करून आणली होती; पण एवढ्या घाईत पायाभरणी शक्य नाही, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही तारीख मान्य केली नाही. त्यामुळे आता दि. १४ व १९ डिसेंबर या दोन्ही तारखांना जुवारीवरील सहा पदरी पुलाची पायाभरणी होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले.
मंत्री ढवळीकर यांचे गडकरी यांच्याशी असलेले जवळचे संबंध हा भाजपमध्ये नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. काही मंत्र्यांना हे जवळचे संबंध आवडत नाहीत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत गेल्या आठवड्यात मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्लीत गडकरी यांच्यासोबत बैठक घेतली. येत्या १३ रोजी गडकरी हे पर्रीकर यांच्या सत्कारासाठी गोव्यात येत आहेत. त्याचवेळी सुमारे पाच हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी केली जावी, अशी विनंती ढवळीकर यांनी गडकरी यांना केली व त्यांनी ती मान्य केली. त्यांनी आपल्या डायरीवर तारीख लिहूनही घेतली. मंत्री ढवळीकर यांनी एका इंग्रजी दैनिकाकडे बोलताना १४ डिसेंबरला जुवारीची पायाभरणी होईल, असे दिल्लीहूनच जाहीरही केले; पण गोव्यात आल्यानंतर त्यांना धक्कादायक अनुभव आला.
मुख्यमंत्री पार्सेकर यांची ढवळीकर यांच्याशी जुवारी पुलाच्या पायाभरणीविषयी चर्चा झाली, तेव्हा येत्या १४ रोजी घाईघाईत पायाभरणी करणे शक्य होणार नाही, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले. १३ रोजी पर्रीकरांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आम्ही व्यस्त असल्याने पुन्हा १४ रोजी जुवारीसह काणकोण बायपास, मडगाव बायपास व अन्य प्रकल्पांच्या पायाभरणीची तयारी करणे कठीण होईल, अशी सरकारची भूमिका आहे. मंत्री ढवळीकर यांच्यापूर्वी मुख्यमंत्री पार्सेकर स्वत: दिल्लीस गेले होते. त्यांनी गडकरी यांना १९ डिसेंबर रोजी जुवारीच्या पायाभरणीसाठी या, अशी विनंती केली होती. गडकरी यांनी तिही विनंती मान्य करून डायरीवर लिहून ठेवले होते; पण नंतर त्यांचा कार्यक्रम अचानक कसा काय बदलला ते मुख्यमंत्र्यांनाही कळू शकले नाही. जुवारी पुलासह गोव्याच्या बांधकाम क्षेत्रात पाच हजार कोटींचे प्रकल्प केंद्राच्या मदतीने उभे राहणार असून त्याचे श्रेय कुणी घ्यावे यावरून भाजप व म.गो. पक्षात छुप्या पद्धतीने रस्सीखेच सुरू आहे. (खास प्रतिनिधी)