पर्रीकरांच्याही व्यवहारांची चौकशी व्हावी!
By Admin | Updated: July 21, 2015 02:19 IST2015-07-21T02:19:38+5:302015-07-21T02:19:48+5:30
पणजी : लुईस बर्जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे.

पर्रीकरांच्याही व्यवहारांची चौकशी व्हावी!
पणजी : लुईस बर्जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे.
मात्र, या प्रकरणाबरोबरच मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना या कंपनीला मोपा विमानतळाचा टेक्निकल फिजिबिलीटी अहवाल तयार करण्यासाठी देण्यात आलेल्या १४ कोटींच्या कन्सल्टन्सी शुल्काच्या बाबतीतही चौकशी व्हावी, अशी मागणी पक्षाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे.
आमदार रेजिनाल्ड यांनी पणजी येथील एका हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका करताना, चौकशीच्या धमक्या या पर्रीकरांच्या पोकळ डरकाळ्या असल्याचे सांगितले.
काँग्रेसने अनेक घोटाळे केल्याचे आरोप करणारे पर्रीकर एकाही घोटाळा प्रकरणाची तड लावू शकले नाहीत.
कोणत्याही घोटाळ्यात आतापर्यंत एखाद्याला दोषी ठरविणे दूरच; परंतु अरोपपत्रही दाखल करण्यात आलेले नाही. पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनीही काहीच केले नाही आणि आताचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही काहीच केले नाही, असे रेजिनाल्ड म्हणाले.
पर्रीकर यांच्या काळात मोपा विमानतळाविषयी शक्याशक्यता पडताळणीसाठी याच कंपनीला कंत्राट का देण्यात आले? या कंपनीला १४ कोटी रुपये का देण्यात आले, याची उत्तरे त्यांनी द्यावीत. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे दिले जात असेल, तर या व्यवहाराविषयीही तपास व्हावा. या प्रकरणात पर्रीकर किंवा मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पुन्हा ‘यू टर्न’ घेतले, तर राज्यात काँग्रेसच्या काळात एकही घोटाळा झाला नव्हता, असाच त्याचा अर्थ होईल, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत उपस्थित
होते. त्यांनीही या दोन्ही प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)