ही तर पर्रीकरांनी आमदारांना लावलेली सेन्सॉरशिप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 20:34 IST2017-09-20T20:33:42+5:302017-09-20T20:34:16+5:30
अनेक मंत्री तसेच सत्ताधारी आमदार जाहीरपणे ड्रग्स व्यवहारांच्या अनुषंगाने पोलिसांवर टीका करत असल्याने व पोलिसांना अकार्यक्षम ठरवत असल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हस्तक्षेप केला होता.

ही तर पर्रीकरांनी आमदारांना लावलेली सेन्सॉरशिप!
पणजी : ड्रग्सप्रकरणी पोलिसांवर जाहीर दोषारोप न करण्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढलेले फर्मान म्हणजे स्वत:च्याच आमदारांवर त्यांनी लागू केलेली सेन्सॉरशिप असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केली आहे.
गेले काही महिने अनेक मंत्री तसेच सत्ताधारी आमदार जाहीरपणे ड्रग्स व्यवहारांच्या अनुषंगाने पोलिसांवर टीका करत असल्याने व पोलिसांना अकार्यक्षम ठरवत असल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या विषयात हस्तक्षेप केला होता. पर्रीकर यांनी सर्व मंत्री आणि सत्तेतील आमदारांना पत्र लिहिले व पोलिसांवर जाहीरपणे निराधार टीका करून पोलिसांचे खच्चीकरण करू नये, त्याऐवजी ड्रग्सप्रकरणी काही माहिती असल्यास ती आपल्याला सादर करावी, असा सल्ला या पत्रातून दिला होता. या पार्श्वभूमीवर नाईक म्हणाले, ड्रग्स व्यावसायिकांवर छापे घालण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहन द्यायला हवे; परंतु मुख्यमंत्री फाइलवर ‘नोट’ लिहून आमदारांचेच खच्चीकरण करतात. एका अर्थी मागील दाराने आणलेली त्यांची ही हुकूमशाहीच आहे. पोलिसांबद्दल मला आदर आहे; परंतु पर्रीकर यांचे हे फर्मान पोलिसांचेही खच्चीकरण करणारे आहे.