लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या १७ रोजी पंचाहत्तरावा वाढदिवस असून पुढील पंधरा दिवस 'सेवा पंधरवडा' साजरा केला जाणार आहे. २ ऑक्टोबरपर्यंत पुढील पंधरा दिवसांच्या काळात आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, दिव्यांगांसाठी उपक्रम तसेच विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन आहे. पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी सिद्धार्थ कुंकळ्येंकर, सर्वानंद भगत उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले की, 'नमो पार्क अंतर्गत देशभरात ७५ नवी उद्याने उभारली जातील. गोव्यातही खाजगी व सरकारी सहभागाने उद्याने होतील. एक पेड माँ के नाम अंतर्गत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाईल. देशभरातील एक हजार जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे घेतली जातील. राज्यात डॉ. शेखर साळकर व डॉ. स्नेहा भागवत यांच्याकडे या शिबिरांची जबाबदारी आहे.'
नाईक यांनी सांगितले की, '२१ रोजी डिचोली येथे नशामुक्त भारत संकल्पनेवर 'मोदी विकास मॅरॅथॉन' होईल. युवक, युवती पाच किलोमीटर दौडीमध्ये सहभागी होतील. या पंधरा दिवसांत मोदींच्या कार्यावरील जीवनपटाचे प्रदर्शन ठिकठिकाणी केले जाईल. डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत आदी संकल्पनांवर चित्रकला स्पर्धा होईल. २५ रोजी दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी केली जाईल. आत्मनिर्भर भारत या विषयावर वैचारिक परिषद होईल. यात वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ मार्गदर्शन करतील. उत्तर गोव्यात १५ ठिकाणी तर दक्षिण गोव्यात ९ ठिकाणी आरोग्य शिबिरे होतील.
पार्सेकरांच्या घरवापसीबद्दल भाष्य नाही
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या घरवापसीबद्दल विचारले असता नाईक यांनी स्पष्टपणे काही भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले की, 'पक्षाचे देशभरात १४ कोटी सदस्य आहेत. तरुण वर्ग पक्षाकडे आकर्षित होत आहे. लवकरच युवा मोर्चा अधिवेशन होईल. त्यावेळी किती नवीन युवक पक्षात येतात हे दिसून येईल.'
अजित पवारांचा समाचार
'पर्रीकर कोण? असे विचारून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले राजकीय अज्ञान व्यक्त केले असावे किंवा ते वेड पांघरून पेडगांवला जात असावेत' अशी जोरदार टीका दामू नाईक यांनी केली. ते म्हणाले की, 'पर्रीकरांचे कार्य सर्व जगाला ठाऊक आहे. मुख्यमंत्री तसेच केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे.