परदीपसिंग बिरींग इंटरपोलच्या जाळ्यात

By Admin | Updated: August 13, 2014 01:46 IST2014-08-13T01:44:40+5:302014-08-13T01:46:30+5:30

पणजी : काणकोण येथील रुबी रेसिडन्सी दुर्घटना प्रकरणातील प्रमुख संशयित फरार बिल्डर परदीपसिंग बिरींग याचा ठावठिकाणा इंटरपोलने शोधून काढला आहे.

Paradipsing bering interpol | परदीपसिंग बिरींग इंटरपोलच्या जाळ्यात

परदीपसिंग बिरींग इंटरपोलच्या जाळ्यात

पणजी : काणकोण येथील रुबी रेसिडन्सी दुर्घटना प्रकरणातील प्रमुख संशयित फरार बिल्डर परदीपसिंग बिरींग याचा ठावठिकाणा इंटरपोलने शोधून काढला आहे. इंग्लंडमध्ये मँचेस्टर येथे इंटरपोलने त्याला हेरले असून त्याला भारतात आणण्यासाठी आवश्यक असलेले सोपस्कार करण्याच्या सूचना गुन्हा अन्वेषण विभागाला करण्यात आल्या आहेत.
४ जानेवारी २०१४ रोजी काणकोण येथील रुबी रेसिडन्सी इमारत कोसळून ३० हून अधिक लोक गाडले गेले होते. या घटनेनंतर अटकेच्या भीतीमुळे कन्स्ट्रक्शनचे बिल्डर परदीपसिंग बिरींग व जगदीप सैगल यांनी विदेशात पळ काढला होता. यांच्यापैकी बिरींगला गाठण्यात यश मिळाल्याचे पत्र गोवा सीआयडीला मंगळवारी मिळाले आहे. सीबीआयच्या इंटरपोल विभागासाठी काम करणाऱ्या विशेष विभागाकडून सीआयडीला हे पत्र पाठविले आहे, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली. दोन्ही बिल्डरांच्या शोधासाठी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. इमिग्रेशन पॉइंटवरही अ‍ॅलर्ट देण्यात आले होते. त्यांच्या गोव्यातील मालमत्ता जप्त करण्यात
आल्या होत्या. आता बिरींगला मँचेस्टर
येथे गाठल्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी कायदेशीर सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सीआयडीकडून हाती घेण्यात आली आहे.
रुबी प्रकरणात यापूर्वी एकूण नऊ लोकांना अटक करण्यात आली होती. तीन पालिका अभियंते, तीन पालिका मुख्याधिकारी, एक कंत्राटदार, एक नगर नियोजन खात्याचा ड्राफ्ट्समन व या खात्याचा उपनगर नियोजक यांना अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Paradipsing bering interpol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.