गंगाराम म्हांबरे, ज्येष्ठ पत्रकार
गोव्यातील राजकारणात अनेकदा अशा काही अनपेक्षित घटना घडल्या आहेत की, ज्याला देशात तोड नाही. उलट येथील प्रकारांपासून बोध घेत देशातील इतर राज्यांनी त्याचे अनुकरण केलेले दिसले. खरोखरच गोव्यातील अजब राजकीय घटना सामान्य मतदारांना अवाक् करणाऱ्या ठरल्या आहेत. देशाने ज्यावेळी इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिला, त्यावेळी राज्यात मात्र अर्स काँग्रेसच्या तिकिटावर सत्तेपर्यंत जाऊ शकतील, असे उमेदवार निवडून आले.
यात तसे नावीन्य नव्हते, पण हे सारे आमदार एकत्रपणे काँग्रेसमध्ये (इंदिरा) गेले आणि राज्यात मतदारांना खुंटीवर टांगून त्यांनी काँग्रेस (आय) चे सरकार स्थापन केले, ही बाब मात्र नवलाची होती. अशाच प्रकारे अनेक राजकीय बाबतीत असाधारण पायंडा पाडण्यात गोव्यातील नेते मागे राहिले नाहीत. ज्याला घोडेबाजार म्हणता येईल, असे व्यवहार आतापर्यंत घडत आले आहेत. काही तरी नावीन्यपूर्ण करण्यात गोमंतकीय नेते नेहमीच पुढे राहिले.
माकडउड्यांत सुवर्णपदक द्यायचे ठरवले तर ते गोव्यालाच मिळेल, यात शंका नाही. नवे घडविण्यात काही चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही, अशी घटना गोव्याच्या राजधानीत परवा घडली. माजी मुख्यमंत्री आणि भाजपला आजच्या सुस्थितीत आणणारे स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल यांनी पणजी महापालिका निवडणुकीत 'आमी पणजेकार' नावाने पॅनल उतरवायची घोषणा केली आहे, ज्याला बहुतेक राजकीय पक्षांनी पाठबळ दिले आहे.
हे पॅनल भाजपचे नेते व मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलविरोधात लढण्यास सिद्ध झाले आहे. माजी महापौर सुरेंद्र फुर्ताद, वैदेही नाईक तसेच मिनीन डिक्रूझ व दत्तप्रसाद नाईक यांचे समर्थन त्यांना लाभले आहे. तसे पाहता, सुरेंद्र फुर्ताद हे या पॅनलचे महापौरपदाचे उमेदवार असतील, असे दिसते. या पॅनलचे उमेदवार सर्वपक्षीय असले तरी ते स्वबळावर लढणार आहेत. ते सारे भाजपच्या पॅनलचा पराभव करण्यासाठी लढतील. या प्रकारात अनेक विरोधाभास दिसतात.
'आमी पणजेकार' पॅनलच्या उमेदवारांना भाजपचे निष्ठावान मतदार मते देतील, स्व. मनोहर पर्रीकर यांचे चाहते मतदान करतील आणि यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ठामपणे उभे राहतील. याचाच अर्थ भाजपचे जुने व ध्येयवादी कार्यकर्ते बाबूश यांच्या भाजप पॅनलचा पराभव करण्यासाठी झटतील. ही लढत तसे पाहता, भाजप विरुद्ध भाजप अशीच होणार नाही का? होय, ती तशीच होईल. मग बाबूश यांच्या उमेदवारांना कुठची मते मिळतील? या प्रश्नालाही सोपे उत्तर आहे. बाबूश कधीही भाजपवर अवलंबून राहिले नाहीत. ते आमदार झाले, मंत्री झाले, पत्नीला आमदारकी मिळाली, मुलाला महापौरपद प्राप्त झाले, हे सारे भाजपच्या कृपेने घडले असे ते मानत नाहीत. गेली दहा वर्षे त्यांनी पणजीवर वर्चस्व मिळवले आहे.
सत्ता आणि आर्थिक बळ यासाठी त्यांना भाजपचा सतत लाभ होत राहिला, ही वस्तुस्थिती आहे, पण त्यांनी व्होटबँक तयार केली, ती स्वतःच्या हिमतीवर. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपची मते गृहीत धरली नव्हती आणि यावेळीही त्यांना त्याची अपेक्षा नसेल. दहा वर्षात पणजीची जी अवस्था झाली आहे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली जी बजबजपुरी आणि दर्जाहीन कामे झाली, त्याची जबाबदारी ते स्वीकारायला तयार नाहीत.
स्थानिक आमदार आणि महापालिकेचे सर्वेसर्वा असूनही त्यांनी कधीच पणजीच्या समस्यांकडे लक्ष दिलेले नाही. एखादा प्रश्न लगेच सोडवला, त्यासाठी धाव घेतली, असे कधीही घडलेले नाही. महापौर तर कॅसिनोप्रश्नी जनतेसमोर भूमिका मांडायलाही तयार नाहीत. सामान्य नागरिकांना, जागृत मतदारांना ते किंमतच देत नसावेत. त्यांनी कोणाला भेटायचेच नाही, असे ठरविले असावे. कारण त्यांची मतपेटी सुरक्षित करण्यास त्यांचे वडील समर्थ आहेत.
भाजपसारखा पक्ष या कुटुंबाच्या मागे उभा राहिला असून उत्पल पर्रीकर हा पक्षाचा व त्यांचा शत्रू क्रमांक एक आहे. किती ही गुंतागुंत असेच कोणी म्हणेल. हा प्रकार हा सध्याच्या सत्तारूढ भाजपच्या स्थितीवर चांगल्यापैकी प्रकाश टाकतो. पक्ष वाढवला, गावोगावी नेला, त्यांना बाजूला काढून सत्तेच्या पिंजऱ्यात अडकलेला भाजप पूर्णपणे आता ज्यांना धोरणाशी, तत्त्वांशी देणे-घेणे नाही अशा नेत्यांच्या हाती गेला आहे. गुण लागला नसेल, पण ताण मात्र निश्चित लागल्याप्रमाणे भाजपचे काही नेते वागू लागले आहेत. गोवा संपवला, अशी भावना जनतेमध्ये का निर्माण होत आहे, याचा विचार भाजप नेत्यांनी अवश्य करावा.
आतापर्यंत लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले नव्हते, कारण त्यांना विरोधक म्हणून हिणवले गेले, न्या. फर्दिन कर्दिन रिबेलो हे तर कोणाचे विरोधक नाहीत, मग त्यांचे ऐकायला सरकार का तयार नाही? किमान त्यांनी सुचवलेले विधायक आणि सकारात्मक मुद्दे सरकारने का स्वीकारू नयेत, हेच कळत नाही. जेवढा त्यासाठी विलंब केला जाईल, तेवढा असंतोष वाढत जाईल. भाजपची मनमानी सहन करण्याच्या मनःस्थितीत गोमंतकीय नाहीत. गोव्याची विल्हेवाट लावल्याचे पातक भाजपने आपल्यावर घेऊ नये, असेच हितचिंतक म्हणत असतील. चाळीस आमदारांच्या विधानसभेने संमत केलेले कायदे जनता बदलू शकत नाही, असे म्हणणे हा केवळ अहंकार आहे.
पणजीत जे उमेदवार निवडून येतील, ते कदाचित ज्येष्ठतेत वर असलेल्या सुरेंद्र फुर्ताद यांना पर्याय म्हणून स्वीकारतील. याचा अर्थ काँग्रेसने आपली स्थिती सुधारली असा लावू नये. उत्पल पर्रीकर यांचे नेतृत्व प्रभावीपणे काम करण्यास नगरसेवकांना प्रोत्साहित करील यात शंका नाही.
अर्थात माना डोलावणारे नगरसेवक निवडायचे, मौनी प्रतिनिधी निवडायचे, की जनहिताची कळकळ असलेले सुपरिचित, स्वच्छ प्रतिमेचे नगरसेवक निवडून पणजीला अच्छे दिन आणायचे हे अखेर पणजीचे ३२ हजार मतदार ठरवणार आहेत. यापैकी किती जण असा विचार करतात की पैशांची पाकिटे स्वीकारून पणजी पाच वर्षासाठी एखाद्या पॅनलकडे सोपवतात हे निकालादिवशी स्पष्ट होईल.
पणजी पुन्हा टुमदार, शिस्तबद्ध आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी मतदारांनी योग्य मतदान करायला हवे. आपल्या मतदानाने राज्याच्या भावी राजकारणाची दिशा स्पष्ट होईल याची जाणीव ठेवावी. गोव्याच्या विशेषतः पणजीच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य मिळायला हवे.
Web Summary : Panaji's municipal election sees Parrikar's son challenging the BJP incumbent, Monserrate. Internal BJP conflict emerges as loyalists support Parrikar, questioning Monserrate's governance and impact on Panaji's development. The election reflects deeper issues within the ruling party.
Web Summary : पणजी नगर निगम चुनाव में पर्रिकर के बेटे ने भाजपा के मौजूदा नेता मोनसेरात को चुनौती दी है। आंतरिक भाजपा संघर्ष सामने आया है क्योंकि वफादार पर्रिकर का समर्थन करते हैं, मोनसेरात के शासन और पणजी के विकास पर सवाल उठाते हैं। चुनाव सत्तारूढ़ दल के भीतर गहरे मुद्दों को दर्शाता है।