पणजी महापालिका घोटाळ्यातील संशयित कारकुनाकडून सर्व कामे काढून घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 19:57 IST2016-07-19T19:57:39+5:302016-07-19T19:57:39+5:30
पणजी महापालिकेतील गाजलेल्या घोटाळ्यांच्या बाबतीत आयुक्त दिपक देसाई कोणती कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यानच्या घडामोडीत सोपो वसुली

पणजी महापालिका घोटाळ्यातील संशयित कारकुनाकडून सर्व कामे काढून घेतली
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 - पणजी महापालिकेतील गाजलेल्या घोटाळ्यांच्या बाबतीत आयुक्त दिपक देसाई कोणती कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यानच्या घडामोडीत सोपो वसुली व पे पार्किंग घोटाळ्यातील संशयित अव्वल कारकून नारायण कवळेकर याला मंगळवारी कोणतेही काम न देता इमारतीत खाली अर्ज एंट्रीला घेतले जातात तेथे कोपऱ्यात बसविण्यात आले.
आयुक्त देसाई यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात आपण कठोर कारवाई करणार असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र त्याचबरोबर आपल्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही, असेही सांगितले. सोमवारी मनपाच्या बैठकीत संशयितांची परेड केली गेली त्याबद्दल विचारले असता निगरगट्ट बनलेल्यांना असे केल्याशिवाय समज येत नाही, असे नमूद करुन त्यांनी अधिक काही भाष्य केले नाही.
महापौर सुरेंद्र फुर्तादो यानी संशयित कर्मचारी तसेच अभियंत्याला बैठकीत बोलावून जो जाब विचारण्यात आला त्याचे समर्थन केले. नारायण हाच सर्व व्यवहार सांभाळत होता त्याच्याकडे विचारणा करण्यात काय गैर, असा उलट सवाल त्यानी केला.
सोपो वसुलीतील ४६ लाखांचा घपला, पे पार्किंगचा १0 लाखांचा घोटाळा आणि रिलायन्स फोर जी केबल प्रकरणी ३२ लाखांचा घोटाळा गेले काही दिवस गाजत आहे. या घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्यांना निलंबित करुन पोलिस तक्रार करावी आणि प्रकरणे लोकायुक्तांकडे सोपवावी, अशी मागणी संतप्त नगरसेवकांनी सोमवारी विशेष बैठकीत केली होती त्यावर आयुक्त दीपक देसाई यांनी चार दिवसात कारवाईचे आश्वासन दिले होते. या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.