पणजीत १0५ निदर्शकांना अटक

By Admin | Updated: November 22, 2015 01:37 IST2015-11-22T01:37:15+5:302015-11-22T01:37:27+5:30

पणजी : फादर बिस्मार्क डायस मृत्यू प्रकरणाचा नि:पक्षपाती तपास करण्याची मागणी करत निदर्शने करणाऱ्या १0५

Panaji has arrested 105 protesters | पणजीत १0५ निदर्शकांना अटक

पणजीत १0५ निदर्शकांना अटक

पणजी : फादर बिस्मार्क डायस मृत्यू प्रकरणाचा नि:पक्षपाती तपास करण्याची मागणी करत निदर्शने करणाऱ्या १0५ आंदोलकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. इफ्फीनिमित्त लागू करण्यात आलेल्या जमावबंदी कलमाचा भंग करण्यात आल्याने त्यांना अटक करण्यात आली.
शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आझाद मैदानाजवळ निदर्शक जमले. अटक करण्यात आलेल्यांत स्वाती केरकर, वाल्मीकी नायक, सुदीप दळवी आदींचा समावेश आहे. यात एकूण ४८ पुरुष व ५७ महिलांचा समावेश होता. आंदोलकांपैकी १५ जणांना पर्वरी पोलीस स्थानकात, तर ९0 जणांना हणजूण
पोलीस स्थानकात नेऊन बंदिस्त करण्यात आले होते. नंतर त्यांची जामिनावर
सुटका करण्यात आली.
फादर बिस्मार्क यांचा खूनच झाला आहे आणि त्याची चौकशी योग्य पद्धतीने होत नाही, असे निदर्शकांचे म्हणणे होते. त्याबद्दल निषेध म्हणून पणजी फेरीबोट धक्क्याजवळ प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. तशी घोषणाही यापूर्वी निदर्शकांनी केली होती; परंतु इफ्फीमुळे पणजीत सुरक्षेच्या कारणासाठी जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. जमावाच्या निदर्शनांमुळे
या कायद्याचा भंग झाला. तसेच काळे
झेंडे व निषेध फलकही निदर्शनकर्त्यांनी लावले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना
अटक करून नेले. निदर्शक फार मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांना अटक करून नेण्यासाठी सहा गाड्या आणाव्या लागल्या. निदर्शकांना विविध पोलीस स्थानकांत ठेवण्यात आले होते.
शांततापूर्व निदर्शने करणाऱ्यांना अटक करून सरकारने आपल्या हुकूमशाही वृत्तीचे पुन्हा प्रदर्शन घडविले असल्याची टीका आम आदमी पार्टीने केली आहे. पक्षाचे निमंत्रक वाल्मीकी नायक यांनी सरकारने केलेला हा अन्याय असल्याचे सांगितले. दरम्यान, अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते सुदीप दळवी यांना उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले होते.
पोलिसांनी आपल्याला ढकलल्यामुळे आपण आपटल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. गोमेकॉत त्यांचा
एक्स-रे काढण्यात आला; परंतु त्यात कोणतीही दुखापत दिसून आली नाही. गोमेकॉत औषधोपचार करून घेण्यास
दळवी यांनी नकार दिला. इंजेक्शनही घेणार नाही आणि औषधही घेणार नाही, असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले.
दरम्यान, वास्कोतील खारवीवाडा येथील काहीजण पणजीतील निदर्शनात भाग घेण्यासाठी जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण वास्को पोलिसांना लागताच त्यांनी कुठ्ठाळी येथे जाऊन या आंदोलकांना ताब्यात घेतले. वास्को पोलीस स्थानकात सुमारे ४0 मिनिटे बसवून त्यांना सोडून देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Panaji has arrested 105 protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.