पणजी महापौरपदी पुन्हा सुरेंद्र फुर्तादो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 12:23 IST2017-03-15T14:12:19+5:302017-07-28T12:23:45+5:30
गोव्यात भाजपाने सत्ता काबीज केलेली असली तरी पणजी महापालिकेची सत्ता मिळवण्यात भाजपाला अपयश आले आहे.

पणजी महापौरपदी पुन्हा सुरेंद्र फुर्तादो
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 15 - गोव्यात भाजपाने सत्ता काबीज केलेली असली तरी पणजी महापालिकेची सत्ता मिळवण्यात भाजपाला बुधवारी अपयश आले. काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या माजी आमदार बाबूश मोन्सेरात गटाचे सुरेंद्र फुर्तादो महापौर झाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आता पणजीतून निवडणूक लढविणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बाबूश मोन्सेरात यांचा पणजी विधानसभा मतदारसंघात थोड्या मतांनी पराभव झालेला आहे. येथे भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्य़ेकर पुन्हा विजयी झालेत. आता पर्रीकर यांच्या विरोधात आपण पणजीतून लढणार असल्याचे बाबूश यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत राजधानी पणजीवर आपलीच हुकूमत चालते हे बाबूशने पुन्हा सिद्ध केले.
महापौरपदी सुरेंद्र फुर्तादो यांची आज अपेक्षेप्रमाणे पुन्हा निवड झाली. भाजपाचे नगरसेवक रूपेश हळर्णकर यांचा फुर्तादो यांनी पराभव केला. फुर्तादो यांना 17 तर हळर्णकर यांना 13 मते पडली. लता पारेख या उपमहापौर म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
महापालिकेची सदस्य संख्या 30 आहे. भाजपाचे 13 नगरसेवक आहेत. माजी बाबूश मोन्सेरात गटाकडे 17 नगरसेवक आहेत. सत्तेसाठी भाजपाला 3 नगरसेवकांची गरज होती, त्यासाठी भाजपाने फोडाफोडीचा प्रयत्न केला, पण जमले नाही. ( विशेष प्रतिनिधी)