घोडेस्वारीस नकार दिला म्हणून टळले संकट; काश्मीरला गेलेल्या ४ युवकांचा जीव थोडक्यात बचावला
By पंकज शेट्ये | Updated: April 24, 2025 12:51 IST2025-04-24T12:50:05+5:302025-04-24T12:51:19+5:30
हे तरुण त्या घटनास्थळापासून अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर होते. तेथील वाहनचालक सुरक्षितपणे आम्हाला घेऊन आमच्या हॉटेलवर आला. त्यामुळे आम्ही वाचलो.

घोडेस्वारीस नकार दिला म्हणून टळले संकट; काश्मीरला गेलेल्या ४ युवकांचा जीव थोडक्यात बचावला
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम बायसरन भागात मंगळवारी जेव्हा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, त्यावेळी काश्मीर फिरण्यासाठी गेलेले वास्कोतील चार तरुण त्या घटनास्थळापासून दहा मिनिटांच्या अंतरावर होते. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या पर्यटकस्थळी घोडेस्वारीने जावे लागत असल्याने आम्ही त्याला नकार दिला. त्यानंतर दहा मिनिटांच्या अंतरावर पहलगाम बायसरन येथे गोळीबार हल्ला झाल्याची माहिती मिळाली. अनेक पर्यटक धावपळ करताना दिसून आल्याची माहिती काश्मीर फिरण्यासाठी गेलेला वास्कोतील तरुण विष्णू केरकर यांनी दिली.
वास्को येथे राहणारे विष्णू केरकर आणि त्यांचे तीन मित्र चार दिवसांपूर्वी काश्मीर फिरण्यासाठी गेले होते. मंगळवारी दुपारी काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बायसरन भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात बऱ्याच जणांचा मृत्यू झाला, तर बरेचजण जखमी झाले. पहलगाम बायसरन येथे जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी तेथून १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर वास्कोतून गेलेले विष्णू केरकर आणि त्यांचे तीन तरुण मित्र तेथील पर्यटनस्थळाचे दर्शन घेत होते. त्यावेळी तेथील काही ट्युरिस्ट गाईडने आम्हाला पहलगाम बायसरन जाणार आहात का? असे विचारले. तेथे फक्त घोडेस्वारीने जाऊ शकतात असे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्यांना नकार दिला. आम्ही नकार दिल्याच्या पाच-दहा मिनिटांनंतर आम्हाला तेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची माहिती मिळाली.
वाहनचालकाचे प्रसंगावधान
आमचा तेथील वाहनचालक सुरक्षितरीत्या आम्हाला घेऊन आमच्या हॉटेलवर आला. जेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करून हल्ला केला, ते पर्यटनस्थळ पाहायला आम्ही जाणार होतो, मात्र तेथे घोडेस्वारीनेच जावे लागत असल्याने आम्ही नकार दिला अन् देवाच्या कृपेनेच आमचा जीव बचावला, असे विष्णू केरकर म्हणाले. आमचा तेथील वाहनचालक आम्हाला सुखरूपरीत्या हॉटेलवर घेऊन आल्यानंतर आता आम्ही तेथे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.