दुसरीतील मुलाला कोंडले
By Admin | Updated: September 27, 2014 00:59 IST2014-09-27T00:59:09+5:302014-09-27T00:59:09+5:30
बार्देस : म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलच्या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ८ वर्षीय विद्यार्थ्याला वाहनात आणि त्याच्याच घरात कोंडून ठेवल्याने दोन शिक्षक,

दुसरीतील मुलाला कोंडले
बार्देस : म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलच्या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ८ वर्षीय विद्यार्थ्याला वाहनात आणि त्याच्याच घरात कोंडून ठेवल्याने दोन शिक्षक, पालक-शिक्षक संघाच्या एक सदस्या आणि एका विद्यार्थ्याच्या आई विरोधात असे चार जणांवर म्हापसा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार शाळेतील दोन विद्यार्थ्यांतील भांडणामुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कुणाला अटक झालेली नाही.
याबाबत म्हापसा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवार दि. २५ रोजी घडली. त्याची तक्रार शुक्रवारी संध्याकाळी देण्यात आली. शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या सदस्या संबंधित मुलाच्या हाताला पकडून मुख्याध्यापकांकडे घेऊन गेल्या. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पकडून आणलेल्या मुलाच्या आईला आणि पालक-शिक्षकच्या सदस्याकडे चर्चा करून वाद मिटवायला हवा होता; परंतु तो न मिटवता मुख्याध्यापकांनी एका शिक्षिकेकडे त्याची जबाबदारी दिली. त्यावर त्या हायस्कूलची शिक्षिका, पालक-शिक्षक संघाच्या सदस्या व दुसऱ्या मुलाची आई मिळून या तिघांनी त्या विद्यार्थ्याला एका वाहनात जबरदस्तीने कोंबून पेडे-म्हापसा येथे ज्या ठिकाणी तो विद्यार्थी राहतो त्या ठिकाणी त्याच्या आईकडे घेऊन गेल्या. त्या वेळी त्याचे घर बंद होते; पण घराची चावी त्या विद्यार्थ्याकडे होती. त्याला त्यांनी घर उघडण्यास सांगितले त्यावर त्याने दार उघडताच त्या सर्वजणी घरात घुसल्या आणि आईची वाट पाहिली; पण बराच वेळ झाला तरी त्या न आल्याने सर्वजणी निघून गेल्या.
आई घरी आल्यावर त्या विद्यार्थ्याने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला असता तिने शुक्रवारी चौकशी केली व नंतर म्हापसा पोलिसांत सेंट ब्रिटोचे मुख्याध्यापक, शिक्षिका, पालक-शिक्षक संघाच्या सदस्या व दुसऱ्या विद्यार्थ्याच्या आईच्या विरोधात म्हापसा पोलिसांत तक्रार दिली. कळंगुटकर यांनी पंचनामा करून त्याच्या विरोधात विद्यार्थ्याला गाडीत कोंबून ठेवणे. दुसऱ्याच्या घरात जबरदस्तीने घुसणे, मुख्याध्यापकाने गुन्ह्याला साहाय्य करण्यास प्रोत्साहन देणे, अशी कलमे लावल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)