लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल : आपण जिला संस्कृती, धर्म, संस्कार म्हणतो ते टिकवण्याचे कार्य पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या अत्याचारी राजवटीतही मराठी भाषेने केले. मायमराठीवर गेली ४० वर्षे आपल्या स्वातंत्र्यकाळात झालेला अन्याय दूर करून तिचे प्राणपणाने रक्षण करण्याची जबाबदारी आता मातृशक्तीच्या खांद्यावर आहे. पुढील पिढ्या सुसंस्कारित राहण्यासाठी मायमराठीला राजभाषा करण्याचे दायित्व निभावण्यासाठी गोमंतकातील संस्कृतप्रेमी मातृशक्ती आपण संघटित करूया, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी येथे केले.
मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे राज्यभर योजलेल्या मातृशक्ती मेळाव्यातील, तिसवाडी प्रखंडाच्या या पहिल्या मातृशक्ती मेळाव्यात वेलिंगकर बोलत होते. येथील नोनू व्हिलेज सभागृहात हा मेळावा झाला. व्यासपीठावर राज्य मातृशक्तीप्रमुख डॉ. प्रा. अनिता तिळवे, राज्य सहप्रमुख अॅड. रोशन सामंत, मध्य गोवा जिल्हाप्रमुख रेश्मा काशीनाथ नाईक, तिसवाडी प्रखंड मातृशक्ती प्रमुख सुजाता देसाई उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर कुंभारजुवेच्या श्रीशांतादुर्गा महिला कला संघाच्या सदस्यांनी नांदी सादर केली. प्रास्ताविक करताना रोशन सामंत यांनी मराठी राजभाषेच्या मागणीमागील संदर्भ, इतिहास आणि आवश्यकता याबद्दल प्रतिपादन करतानाच, स्वाक्षरी अभियान यशस्वी करण्यासाठी कसे प्रयत्न करावेत हे विषद केले.
दीपाली अनिल नाईक यांनी मराठी महतीवर आधारित कवितावाचन आणि गार्गी नाईक या उच्च माध्यमिक विद्यार्थिनीने मराठीची शाळा व मराठी भाषेची चाललेली विटंबना पोवाड्यातून मांडली. जुवे येथील श्री सरस्वती हायस्कूलच्या महिला-पालक-समूहाने गीत सादर केले. खांडोळा येथील प्रीतिसंगम हौशी भजनी व नाट्य महिला मंडळाने पारंपरिक धालो लोककलेचे उत्तम सादरीकरण केले.
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला पूर्ण समर्थन देणाऱ्या ठरावाचे सविस्तर वाचन सुजाता बाकरे यांनी केल्यावर, उपस्थित मातृशक्ती समुदायाने दोन्ही हात ऊंच उभारून ओमच्या ध्वनीसह ठराव संमत केला.
स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ
मेळावा सुरू होण्यापूर्वीच स्वाक्षरी अभियानाचा प्रारंभ करून सह्या गोळा करण्यात आल्या. तिसवाडी प्रखंड प्रमुख हनुमंत मांजरेकर, प्रखंड समन्वयक सुरेश डिचोलकर व सुजाता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे काम झाले. मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असलेल्या महिलांचा अनिता तिळवे व रोशन सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आभार सुजाता देसाई यांनी केले.
Web Summary : Subhash Velingkar urged Goan women to unite for Marathi's official status, emphasizing its cultural preservation role. A Tiswadi meeting featured speeches, cultural performances, and a resolution supporting the cause. An initiative to gather signatures was launched to support the movement.
Web Summary : सुभाष वेलिंगकर ने मराठी को राजभाषा बनाने के लिए गोवा की महिलाओं से एकजुट होने का आग्रह किया, इसके सांस्कृतिक संरक्षण की भूमिका पर जोर दिया। तिसवाड़ी की एक बैठक में भाषण, सांस्कृतिक प्रदर्शन और कारण का समर्थन करने वाला एक प्रस्ताव शामिल था। आंदोलन का समर्थन करने के लिए हस्ताक्षर अभियान शुरू किया गया।