मडगावच्या नगराध्यक्षांचे बांधकाम पाडण्याचा आदेश
By Admin | Updated: March 24, 2015 01:15 IST2015-03-24T01:15:18+5:302015-03-24T01:15:41+5:30
मडगाव : मडगावचे नगराध्यक्ष गोंझाक रिबेलो यांचे मुंगूल येथे असलेले वादग्रस्त बेकायदेशीर बांधकाम शेवटी त्वरित पाडण्याचा

मडगावच्या नगराध्यक्षांचे बांधकाम पाडण्याचा आदेश
मडगाव : मडगावचे नगराध्यक्ष गोंझाक रिबेलो यांचे मुंगूल येथे असलेले वादग्रस्त बेकायदेशीर बांधकाम शेवटी त्वरित पाडण्याचा आदेश मडगावचे मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांनी दिला आहे. यामुळे आता मडगाव पालिकेत नगराध्यक्ष विरुद्ध मुख्याधिकारी, असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
ज्या जागेत हे बांधकाम आहे ती जागा २0१३ मध्ये बिल्डरने मडगाव नगरपालिकेच्या नावे दान केली आहे. त्यामुळे ही नगरपालिकेची मालमत्ता असल्याचे सिध्द झाले आहे. हे बांधकाम नगरपालिकेच्या जागेत असल्याने ते विनाविलंब मोडणे योग्य ठरेल, असा अभिप्राय देणारा आदेश मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांनी सोमवारी सायंकाळी दिला.
दरम्यान, हा आदेश दिल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मडगाव पालिकेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा पोलीस बंदोबस्त पाहून नगराध्यक्ष रिबेलो यांनी आम्ही बिहारात तर नाहीत ना असे आपल्याला वाटले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. माडेल-मडगाव येथील नागरिक व पत्रकार सावियो डायस यांनी रिबेलो यांच्या या बांधकामाविरोधात तक्रार दाखल केली होती. या बांधकामाचा बार म्हणून वापर केला जायचा. हे बांधकाम नगराध्यक्ष रिबेलो यांचे वडील ज्युलियो रिबेलो यांच्या मालकीचे असून नगराध्यक्ष रिबेलो यांच्याकडे या दुकानाचा ताबा असल्याचे या तक्रारीत म्हटले होते.
या बांधकामाच्या मागे असलेल्या रिबेलो यांच्या घराच्या जागेत एका बिल्डरने इमारत उभी केली असून त्या वेळी बार असलेली ही जागा नगरपालिकेच्या नावे दान केली होती. ही जागा रस्ता रुंदीकरणासाठी सोडली होती असे असतानाही नगरसेवक असलेले रिबेलो यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हे बेकायदेशीर बांधकाम कायम ठेवले, असा डायस यांचा दावा होता.
मडगाव मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या या तक्रारीची सुरुवातीला दखल न घेतल्याने डायस यांनी नगरपालिका प्रशासन संचालकाकडे दाद मागितली होती. या तक्रारीवर एका महिन्यात काय तो निर्णय घ्यावा, असे नमूद करून ही फाईल पुन्हा मडगाव पालिकेकडे पाठविण्यात आली होती.
(प्रतिनिधी)