विरोधी आमदारांनी सोडले सभागृह; अधिवेशन एकच दिवसाचे ठेवल्याने निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2025 13:10 IST2025-02-07T13:09:33+5:302025-02-07T13:10:59+5:30
विधानसभेचे कामकाज केवळ एक दिवसाचे ठेवल्याने निषेध करीत विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात गोंधळ माजवला.

विरोधी आमदारांनी सोडले सभागृह; अधिवेशन एकच दिवसाचे ठेवल्याने निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विधानसभेचे कामकाज केवळ एक दिवसाचे ठेवल्याने निषेध करीत विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात गोंधळ माजवला. या गदारोळात राज्यपालांनी अभिभाषण चालूच ठेवले. नंतर सहा विरोधी आमदारांनी सभात्याग केला. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई मात्र निषेधाचा फलक घेऊन राज्यपालांचे अभिभाषण संपेपर्यंत सभागृहातच उभे राहिले.
नवीन वर्षातील अधिवेशनाचा गुरुवारी पहिला दिवस असल्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई अभिभाषणासाठी उभे राहिले असता विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी 'एक दिवसाचे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप करत अभिभाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ढासळलेली कायदा सुव्यवस्था तसेच अन्य महत्वाचे विषय आम्हाला मांडायचे आहेत. मात्र केवळ एक दिवसाचे अधिवेशन ठेवून थट्टा चालवली आहे. केरळमध्ये सरकारने वर्षभरात पन्नास दिवस अधिवेशन घेतले. सहा महिन्यांनी गोव्यात अधिवेशन होत आहे व तेही एक दिवसाचे होय. लोकशाही पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे. यावेळी आमदार विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगश, क्रूझ सिल्वा यांनी राज्यपाल अभिभाषणास उभे राहिले असता निषेध नोंदवून घोषणा दिल्या. निषेध म्हणून विरोधी आमदार दंडाला काळ्या फिती बांधून व काळे कपडे परिधान करून सभागृहात आले होते. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई काळे कपडे परिधान करून नोकरीकांड, जमीन हडप व अन्य कथित घोटाळ्यांबाबत निषेधाचा फलक घेऊन आले होते.
कामकाज सल्लागार समितीचा अहवाल विरोधकांनी मान्य केला नाही. या अहवालाला आक्षेप घेण्यात आला. विधानसभेचे अधिवेशन केवळ एक दिवसाचे ठेवण्याबाबत विरोधी आमदारांनी आक्षेप घेणारी पत्रे लिहिली होती. परंतु त्याचा उल्लेख अहवालात केला नाही, हे निदर्शनास आणून देण्यात आले. सभापतींनी नंतर आवाजी मतदानाने तो संमत करून घेतला.
सभापती रमेश तवडकर यांनी गोंधळ माजवणाऱ्या विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढीन, असा इशारा दिला. त्यानंतर विजय वगळता सर्व विरोधी आमदारांनी सभात्याग केला. यात वीरेश बोरकर यांचाही समावेश होता.
सरदेसाई म्हणाले की, सावंत सरकारला विरोधकांना सामोरे जायचे नाहीय. केवळ घटनात्मक तरतुदीची पूर्तता म्हणून एक दिवसाचे अधिवेशन बोलावले आहे. या सरकारला कोणत्याही विषयावर सभागृहात चर्चा करायची नाहीय. घटनेची ही निव्वळ थट्टा होय.
आपचे आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले की, एक दिवसाचे अधिवेशन ठेवून या सरकारला लोकांचा विश्वास व सब का साथ मिळणार नाही.
मुख्यमंत्र्यांकडून नाराजी
या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गोवा विधानसभा अधिवेशनाच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला असावा. आमदारांनी प्रथेचे पालन करुन सभागृहाचे पावित्र्य जपायला हवे. राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर ते परत जात असताना मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्याने त्यांच्यासोबत बाहेर जाऊन त्यांना निरोप देण्याची प्रथा आहे. परंतु विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे काल राज्यपालांसोबत गेले नाहीत. अधिवेशन एक दिवसाचेच ठेवल्याने निषेध म्हणून त्यांनी सभात्यागही केला होता. तर सभापती रमेश तवडकर यांनी गोंधळ माजवणाऱ्या विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढीन, असा इशारा दिला.