तवडकर यांच्या प्रस्तावाला मंत्र्यांचा विरोध
By Admin | Updated: November 21, 2015 02:10 IST2015-11-21T02:09:55+5:302015-11-21T02:10:12+5:30
पणजी : भाजपचे मंत्री रमेश तवडकर यांनी साखळी शहरात विभागीय कृषी कार्यालय सुरू करण्यासाठी ३४ नवे कर्मचारी भरण्यासाठी मंजुरी मिळविण्याच्या हेतूने

तवडकर यांच्या प्रस्तावाला मंत्र्यांचा विरोध
पणजी : भाजपचे मंत्री रमेश तवडकर यांनी साखळी शहरात विभागीय कृषी कार्यालय सुरू करण्यासाठी ३४ नवे कर्मचारी भरण्यासाठी मंजुरी मिळविण्याच्या हेतूने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलेला प्रस्ताव काही मंत्र्यांनी तीव्र हरकत घेऊन रोखला.
राज्यात भाजप-म.गो.चे आघाडी सरकार अधिकारावर आहे. भाजपच्या कुठच्याही मंत्र्याने कसलाही प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला तरी, तो मंजूर होतोच. एखाद्यावेळी चर्चेअंती प्रस्ताव फेरविचारार्थ मागे ठेवला जातो. मात्र, शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत वेगळे घडले.
कृषीमंत्री तवडकर यांनी साखळीत नवे विभागीय कृषी कार्यालय सुरू करूया व त्यासाठी ३४ कर्मचारी नेमूया, अशी भूमिका घेतली. तसा प्रस्तावही त्यांनी बैठकीत मांडला.
या वेळी एक-दोन मंत्र्यांनी मोठे आश्चर्य व्यक्त केले. डिचोली शहरात विभागीय कृषी कार्यालय आहे. डिचोली तालुक्यात केवळ तीन विधानसभा मतदारसंघ असताना व तिथे विभागीय कृषी कार्यालय असताना साखळीसाठी वेगळे विभागीय कार्यालय का म्हणून हवे, अशी विचारणा काही मंत्र्यांनी केली. सासष्टी तालुक्यात आठ व बार्देसमध्ये सात विधानसभा मतदारसंघ असतानाही त्या तालुक्यांमध्येही प्रत्येकी एक विभागीय कृषी कार्यालय आहे, मग साखळीत आणखी नवे विभागीय कार्यालय कशासाठी व त्यासाठी ३४ कर्र्मचारी का म्हणून नियुक्त करायला हवेत, अशी विचारणा काही मंत्र्यांनी केली. या वेळी मंत्री तवडकर यांनी योग्य ते स्पष्टीकरण दिले नाही. यामुळे हा प्रस्ताव मंजुरीविना मागे ठेवण्यात आला.
(खास प्रतिनिधी)