लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध मर्मभेदी प्रश्नांचा भडिमार करून सरकारची कोंडी करण्यात विरोधक अजिबात कमी पडले नाहीत. दुसरीकडे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना या अधिवेशनात खऱ्या अर्थाने कॅप्टनची भूमिका पार पाडताना वेळोवेळी हस्तक्षेप करून मंत्र्यांना सावरावे लागले.
स्व. भाजप सरकारच्या काळात, २०१२ नंतर लोकांनी एक कालखंड असा पाहिला आहे, जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक नवख्या सर्व मंत्र्यांना विरोधक एक एक करून लक्ष्य करायचे आणि त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र, मुख्यमंत्री पर्रीकर वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती निभावून न्यायचे. याचा परिणाम असाही व्हायचा की मुख्यमंत्री सांभाळतील म्हणून काही काही मंत्री गृहपाठ करण्याविषयी गंभीरही नसायचे. ही गोष्ट जेव्हा पर्रीकर यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी प्रत्येक मंत्र्याचा सर्ववेळी कैवार घेणे सोडून दिले होते. यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत हे बहुतेकवेळा मंत्र्यांनाच उत्तर देण्यास भाग पाडायचे. मात्र, यावेळी त्यांनी पवित्रा बदलला.
एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्वच मंत्र्यांच्या ते मदतीला धावले आणि परिस्थिती सांभाळून नेली, मग ते कृषिमंत्री रवी नाईक असोत, महसूलमंत्री बाबूस मोन्सेरात किंवा मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर. नगर नियोजन खात्याशी संबंधीत प्रश्नांवर विरेश बोरकर यांनी नेवरा येथील लोकांचा मुद्द उपस्थित केला, तेव्हाही मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून बोरकर यांना शांत करावे लागले.
नेहमी जोशपूर्ण कामगिरी बजावणारे आरजीचे आमदार विरेश बोरकर यांचे एक नवीन रुप सभागृहाने अनुभवले. अत्यंत अभ्यासपूर्ण कामगिरी बजावताना त्यांनी विविध सामाजिक विषयांवर सत्ताधाऱ्यांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. नवखा आमदार असूनही एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करा करावा, त्याचे ते अत्यंत बोलके उदाहरण ठरावे. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आपला प्रभाव दाखवल्याचे म्हटले जाते.
विरोधकांची दमदार कामगिरी
विरोधी आमदार संख्येने कमी असले तरी त्यांनी आपले प्रश्न लावून धरले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुने गोवेतील वादग्रस्त बांधकामाच्या मुद्द्यावरून कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. तो मुद्दा जुनाच असला तरी यावरून आपण एकजूट दाखवू शकतो हे विरोधकांनी दाखवून दिले. विरोधकांच्या वैयक्तिक कामगिरीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई यांनी नेहमीप्रमाणे सरकारची मर्मस्थळे शोधून वार करण्याची शैली कायम ठेवली. सत्ताधारी आमदारांच्या खांद्यावरून सरकारवर तीर मारण्याचे कसब दाखवताना सरदेसाईंनी कधी गोविंद गावडे यांचे मंत्रिपद जाण्याचा वापर केला तर कधी नीलेश काब्राल यांच्या. एल्टन डिकॉस्ता, वेंझी हेसुद्धा कमी पडले नाहीत.