सरकारवर आरोप करणे हाच विरोधकांचा अजेंडा: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:39 IST2024-12-24T08:38:52+5:302024-12-24T08:39:50+5:30
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

सरकारवर आरोप करणे हाच विरोधकांचा अजेंडा: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सरकारवर आरोप करून विरोधक आपला राजकीय अजेंडा पुढे नेत आहेत. आमचे सरकार हे लोकाभिमुख असून, जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ती काहीजण स्वतःला एनजीओ म्हणत सरकारविरोधात व्हिडीओ जारी करतात व ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. सोशल मीडियाचा ते गैरवापर करतात.
वानरमारी समाजाच्या विकासाच्या दृष्टीनेही सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. या समाजातील मुले शिकावित, आपल्या पायावर उभी राहवीत, त्यांना वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यादिशेने त्यांना जन्मदाखला जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांचे डॉक्युमेंटेशन केले जात आहे. भविष्यात वानरमारे समाजातील मुले चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावरही पोहोचतील. त्यांना मुख्य प्रवाहात आणले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
९२८ तक्रारींचे निराकरण
दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने सुशासन सप्ताहादरम्यान जनतेच्या ९२८ तक्रारींचे निराकरण केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्य आणि केंद्रीय आपत्ती निवारण योजनांतर्गत प्राप्त झालेल्या ५६८ दाव्यांसाठी २ कोटी ७७ लाख ६० हजार ५८९ रुपयांच्या मंजुरी आदेशांचे वितरण केले. माजी जिल्हाधिकारी एन. डी. अग्रवाल यांचा सत्कार झाला. ही कार्यशाळा विलंबित जन्म नोंदणीशी संबंधित आदेशांचे वितरण करण्यासाठीही महत्त्वाची ठरली.