लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारत सर्व बाजूंनी शक्तिशाली देश बनतोय हे सर्वांना कळून चुकले; परंतु काहीवेळा देशाला अंतर्गत धोकाच जास्त असतो. केवळ सीमेवरच देशद्रोही नाहीत तर काही घुसखोरांनाही त्यांची जागा दाखवायला हवी, असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केले.
डिचोली येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरीत्या पार पाडले. पाकिस्तानला तसेच जे कोणी दहशतवादाला खत-पाणी घालतात त्यांना आपली ताकद भारताने दाखवून दिली. देश आर्थिकदृष्ट्याही मजबूत बनत असून दहशतवादाच्या उच्चाटनासाठी आम्ही कोणाचीही तमा बाळगणार नाही; परंतु त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवे की, काहीवेळा अंतर्गत धोकाही असतो.
आदरांजली वाहताना मुख्यमंत्री म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांबरोबर पाकिस्तानची कोंडी केली. दहशवाद्यांसह त्यांचे तळ भारतीय सैन्यदलाने उद्ध्वस्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्यदलांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद आहे. या कारवाईवेळी भारतीय सैनिक शहीद झाले त्यांना मी याप्रसंगी आदरांजली वाहतो.