मडगावच्या कोविड इस्पितळात केवळ 40 परिचारिका; 5 पॉझिटिव्ह झाल्याने भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 06:08 PM2020-07-08T18:08:22+5:302020-07-08T18:09:11+5:30

अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या दोन परिचारिका पॉझिटिव्ह झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता परिचारिकांचा तुटवडा अधिकच जाणवू लागला असून सरकारने त्वरित कंत्राटी पद्धतीवर नव्या परिचारिका नेमाव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

Only 40 nurses at Kovid Hospital in Madgaon; 5 got corona positive | मडगावच्या कोविड इस्पितळात केवळ 40 परिचारिका; 5 पॉझिटिव्ह झाल्याने भीतीचे वातावरण

मडगावच्या कोविड इस्पितळात केवळ 40 परिचारिका; 5 पॉझिटिव्ह झाल्याने भीतीचे वातावरण

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मडगावच्या कोविड इस्पिटलाच्या कित्येक 'सक्सेस स्टोरीज' ऐकू येत असल्या तरी या स्टोरीज तयार करण्यासाठी या इस्पितळातील कर्मचारांन्या अक्षरशः घाम गाळावा लागत आहेत. 220 रुग्ण क्षमतेच्या या इस्पितळात सध्या केवळ 40 परिचारिकाच ड्युटीवर असून त्यांना रिलिव्ह करण्यासाठी दुसरे कुणीच नसल्याने त्यांनाच अविश्रांत काम करावे लागत आहे.

या इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या दोन परिचारिका पॉझिटिव्ह झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता परिचारिकांचा तुटवडा अधिकच जाणवू लागला असून सरकारने त्वरित कंत्राटी पद्धतीवर नव्या परिचारिका नेमाव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

पूर्वी इएसआयच्या ताब्यात हे इस्पितळ असताना त्यात 20 परिचारिका काम करायच्या हे इस्पिटल कोविड इस्पिटल म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर त्यात इतर ठिकाणाहून आणखी 25 परिचारिका आणण्यात आल्या. मात्र आतापर्यंत त्यापैकी 5 जण पॉझिटिव्ह झाल्याने राहिलेल्या  40 परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडू लागला आहे.

या इस्पितळातील अवस्था कशी आहे त्याबद्दल बोलताना एक परिचारिका म्हणाली, सुरवातीला या इस्पितळातील केवळ दोन मजल्यावरच कोविड रुग्ण ठेवायचे त्यावेळी या परिचारिका घेतल्या होत्या. पण आता एकूण 5 मजल्यावर रुग्ण ठेवण्यात आले असून त्या तुलनेने परिचारिकांची संख्या तेवढीच ठेवण्यात अली आहे. या इस्पितळात तीन पाळ्यात काम केले जाते. प्रत्येक पाळीला एका मजल्यावर किमान तीन परिचारिकांची गरज असते. त्यामुळे एका पाळीला 15 या प्रमाणे दर दिवसासाठी 45 परिचारिकांची गरज भासत असल्याने सगळ्याच परिचारिकाना अविश्रांत काम करावे लागते.

पूर्वी या इस्पितळात काम करणाऱ्या परिचारिकाना एक आठवडा काम केले की एक आठवडा विश्रांती दिली जायची पण आता रुग्ण वाढल्याने ही विश्रांती देणे बंद केले असून सर्वाना सक्तीने रोज कामावर यावे लागते. यातील काही परिचारिका मागचे दोन तीन महिने आपल्या घरीच न गेल्याने विलक्षण तणावाखाली त्यांना काम करावे लागत आहे. काहीजण मानसिक तणावाखाली वावरत असल्याची माहिती मिळाली आहे.

एक तर परीचारिकाची संख्या वाढवावी किंव्हा दोन आठवडे काम केल्यावर त्यांना एका आठवड्याची सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. या परिचारिकावरील ताण कमी करण्यासाठी हॉस्पिसिओतील परिचारिकाना कोविड इस्पितळात बदलीवर आणावे, अशी मागणीही केली जात आहे. पण त्यामुळे हॉस्पिसिओचे वेळापत्रक कोलमडणार यासाठी हीही मागणी मान्य केली जात नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी यात लक्ष घालून ही समस्या लवकर सुटवावी अशी मागणी केली जात आहे.

 

अतिदक्षता विभाग अपुरा

या इस्पितळात जो अतिदक्षता विभाग आहे तो एकदम अपुरा असून त्यात केवळ सहा रुग्णच ठेवता येतात. जर रुग्णाची संख्या वाढली तर या इस्पितळातील अतिदक्षता यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता आहे. याच चिंचोळ्या अतिदक्षता विभागात काम करताना या इस्पितळातील 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

जुनाट गाडी

या इस्पितळात काम करणाऱ्या परिचारिकाना काम सुटल्यावर हॉटेलवर सोडण्यासाठी ज्या गाडीचा वापर केला जातो ती गाडीच खिळखिळी झाली असून ता गाडीचे दारही व्यवस्थित बसत नाही. याच गाडीचा वापर तपासणी केलेल्याचे स्वेब नमुने चाचणीसाठी  घेऊन जाण्यासाठी केला जातो. या परिचारिकांची ने आण करण्यासाठी निदान चांगली गाडी तरी द्यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Only 40 nurses at Kovid Hospital in Madgaon; 5 got corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.