लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कर्करोग, मधुमेह, हृदयरोग व मूत्रपिंड विषयक आजारांबाबत राज्यातील एक लाख लोकांची तपासणी हाती घेतली जाणार आहे. असंसर्गजन्य रोगांबाबत व्यापक अभ्यासार्थ सरकारने टाटा मेमोरियल इस्पितळ व ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सामंजस्य करार केला असून, या माध्यमातून ही आरोग्य तपासणी होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एकदा हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर सरकारला आरोग्य विषयक धोरण, तसेच निधीची तरतूद करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग होईल. गोव्यात कमी वयातच मधुमेह व इतर आजार दिसून येत असल्याने अशा प्रकारचा व्यापक अभ्यास ही काळाची गरज होती.
या उपक्रमाद्वारे गोवा आपल्या नागरिकांचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्यासाठी एक सक्रिय पाऊल उचलत आहे. टाटा मेमोरियल व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहयोगाने आरोग्य तपासणीनंतर पुरावेधारित शिफारशी सरकारकडे येतील व त्या अनुषंगाने पुढील पावले उचलता येतील.
दरम्यान, सरकारने टाटा मेमोरियल इस्पितळ व ऑक्सफर्ड विद्यापीठाकडे करार केल्यामुळे आता राज्यातील आरोग्य क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. राज्यात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सरकारचे हे मोठे पाऊल आहे. यामुळे गोमंतकीयांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत.
कार्यक्रमाला टाटा मेमोरियलचे डॉ. राजेश दीक्षित, शरयू म्हात्रे, प्रा. सारा, प्रदेश भाजपच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर, आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. रुपा नाईक व इतर अधिकारी उपस्थित होते. पर्वरी येथे मंत्रालयात मंगळवारी टाटा मेमोरियल इस्पितळ व ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सामंजस्य करार प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, टाटा मेमोरियलचे डॉ. राजेश दीक्षित, शरयू म्हात्रे, प्रा. सारा, डॉ. शेखर साळकर, आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. रुपा नाईक आदी.
मुख्य सचिव व्ही. कांडावेलू म्हणाले की, गोव्यात बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. हा व्यापक अभ्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सरकारला मदत करील.
गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले की, खाण्याच्या सवयी तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे गोव्यात तरुण-तरुणींमध्येही हृदयरोगाचे आजार दिसून येतात. हा व्यापक अभ्यास बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकणार असून, त्यामुळे पुढील उपाययोजना करता येतील.