छुप्या कॅमेऱ्यात आक्षेपार्ह दृश्ये
By Admin | Updated: April 5, 2015 01:17 IST2015-04-05T01:10:37+5:302015-04-05T01:17:40+5:30
पणजी : ‘फॅबइंडिया’च्या कांदोळी येथील आस्थापनात कपडे बदलणाऱ्या व्यक्तींची छुप्या कॅमेऱ्याद्वारे आक्षेपार्ह दृश्ये टिपल्याचे तपासाअंती निष्पन्न

छुप्या कॅमेऱ्यात आक्षेपार्ह दृश्ये
पणजी : ‘फॅबइंडिया’च्या कांदोळी येथील आस्थापनात कपडे बदलणाऱ्या व्यक्तींची छुप्या कॅमेऱ्याद्वारे आक्षेपार्ह दृश्ये टिपल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. मात्र, याबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी अटकेतील चौघा कर्मचाऱ्यांना शनिवारी जामीन मिळाला. मात्र, या प्रकारामुळे देशी-विदेशी पर्यटकांनी छुप्या कॅमेऱ्याची धास्ती घेतली आहे. अशा आस्थापनांमध्ये खरेदीसाठी जाणारे गोमंतकीय ग्राहकही धास्तावले आहेत.
गोवा भाजपाच्या प्रभारी व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी (दि.३) ‘फॅबइंडिया’च्या कांदोळी येथील आस्थापनात ‘छुपा कॅमेरा’ पकडल्याने मोठी खळबळ उडाली होती. गोवा पोलिसांचा गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी) या प्रकरणाची चौकशी करत आहे. इराणी अनेकदा गोव्यात येत असतात. थिवी येथे त्यांचे निवासस्थान आहे. इराणी शुक्रवारी या दुकानात कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथील कपडे बदलण्याच्या कक्षात कॅमेरा लावलेला नाही; परंतु या कक्षाबाहेरील कॅमेरा त्या कक्षावर रोखल्याचे इराणी यांना आढळून आले होते.
गोव्याला वार्षिक सरासरी तीस लाख पर्यटक भेट देतात. त्यापैकी पाच लाख विदेशी पर्यटक असतात. बहुतांश श्रीमंत पर्यटक कांदोळी व अन्य किनारी भागातील फॅबइंडियाच्या दुकानास भेट देत असतात. त्यांच्यातून आता भीती व्यक्त होत आहे. एक प्रकारची धास्ती पर्यटक व्यक्त करत आहेत. अनेक गोमंतकीय ग्राहकही फॅबइंडियाच्या स्टोअरमध्ये जातात. त्यांच्यातही उलटसुलट चर्चा आहे.
(खास प्रतिनिधी)