आता दर्जेदार भाज्या मिळण्याची आशा
By Admin | Updated: September 27, 2014 01:05 IST2014-09-27T00:59:56+5:302014-09-27T01:05:14+5:30
पणजी : फलोत्पादन विकास महामंडळाच्या दालनांसाठी पुरविण्यात येणारी भाजी आता एकत्रित एका जागेवर उतरविण्यासाठी करासवाडा येथे डेपोची सोय केली जाणार आहे.

आता दर्जेदार भाज्या मिळण्याची आशा
पणजी : फलोत्पादन विकास महामंडळाच्या दालनांसाठी पुरविण्यात येणारी भाजी आता एकत्रित एका जागेवर उतरविण्यासाठी करासवाडा येथे डेपोची सोय केली जाणार आहे. याबाबत कागदोपत्री व्यवहार सुरू आहे. लवकरच ही जागा निश्चित होईल आणि यापुढे डेपोत भाज्या उतरवून राज्यातील ८५0 दालनांत पुरविल्या जातील.
मध्यंतरी फलोत्पादन मंडळाने गाडेधारकांची बैठक घेतली होती. त्यात निकृष्ट दर्जाच्या भाज्यांबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. पुरवठादारांकडून अनेकवेळा कुजके कांदे, बटाटे व अन्य सडलेल्या भाज्या पुरविल्या जात असल्याने ग्राहकांच्या तक्रारींना आम्ही कंटाळलो आहोत, असे गाडेधारकांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. परराज्यातून आणल्या जाणाऱ्या भाज्या गाडेधारकांनी सकाळी तपासून घ्यायला हव्यात, असे महामंडळाने सांगितले असले, तरी अनेकदा आळसापोटी गाडेधारक भाजी तपासून घेत नाहीत, परिणामी खराब भाजी ग्राहकांना पुरविली जाते. यामुळे गाडेधारकांचे व ग्राहकांचे नुकसान होते. यापुढे असे होऊ नये म्हणून करासवाडा-म्हापसा येथे डेपोत भाजी एकत्रित उतरविली जाईल. तेथे तपासून ती सर्व दालनांना पुरविली जाईल, असे फलोत्पादन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार किरण कांदोळकर यांनी सांगितले.
सवलतीच्या दरात पुष्पगुच्छ विक्री
येत्या ७, ८ व ९ आॅक्टोबर रोजी मुंबईहून पुष्पगुच्छ प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांना बोलाविले आहे. याबाबतची तारीख अजून निश्चित झाली नाही. मात्र, येत्या आॅक्टोबरमध्ये पणजी येथील कार्यालयानजीक सवलतीच्या दरात पुष्पगुच्छ विक्री दालन उभारण्याचे ध्येय असल्याचे कांदोळकर म्हणाले. पुष्पगुच्छाची दालने सुरू करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना काही दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी लागणारे सामान आणि फुलेही महामंडळातर्फे पुरविली जातील. पुष्पगुच्छाची दालने शहरी भागातच उघडण्याचा विचार असून म्हापसा, पर्वरी, वास्को, मडगाव, फोंडा इत्यादी ठिकाणी उघडण्यात येतील.
या योजनेसाठी महामंडळाकडून पुष्पगुच्छसाठी लागणाऱ्या खर्चाची १५ टक्के रक्कम दिली जाईल. त्यामुळे बाजारभावापेक्षा कमी दरात पुष्पगुच्छ विक्री करता येईल. महामंडळाकडून राज्यात पुष्प उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांकडून फुले विकत घेऊन पुरवठा करण्यात येईल. खुल्या बाजारपेठात अवाढव्य दर लावून विक्री करण्यात येणाऱ्या पुष्पगुच्छांच्या विक्रीवर मर्यादा यावी म्हणून ही सेवा देण्यात येणार असल्याचेही कांदोळकर यांनी सांगितले.