आता प्रत्येक शाळेत दोन शिक्षक
By Admin | Updated: June 15, 2015 01:30 IST2015-06-15T01:28:40+5:302015-06-15T01:30:42+5:30
कमी पटसंख्येमुळे एकशिक्षकी बनलेल्या २८० सरकारी प्राथमिक शाळा आता दोन शिक्षकी बनणार आहेत. नवीन निवडण्यात आलेल्या शिक्षकांतून या

आता प्रत्येक शाळेत दोन शिक्षक
कमी पटसंख्येमुळे एकशिक्षकी बनलेल्या २८० सरकारी प्राथमिक शाळा आता दोन शिक्षकी बनणार आहेत. नवीन निवडण्यात आलेल्या शिक्षकांतून या विद्यालयांना शिक्षक पुरविले जातील. शिक्षण खात्याने हाती घेतलेली इंग्रजी शिक्षक पदांची भरती ही एकशिक्षकी विद्यालयांच्या पथ्यावर पडली आहे. ३२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असली तरी तूर्त २७५ शिक्षकांना निवडण्यात आले आहे. या शिक्षकांपैकी बहुतेक शिक्षकांना या विद्यालयांत पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली.
नवीन शिक्षक भरती ही मुख्यत: इंग्रजी विषय शिकविण्यासाठी करण्यात आली होती. तसेच एका शिक्षकाला एकापेक्षा अधिक शाळांत शिकवावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. या मूळ धोरणात थोडासा बदल करण्यात येणार आहे. शिक्षकांना एकापेक्षा अधिक विद्यालयांत शिकवावे लागणारच आहे; परंतु वेळापत्रक ठरविताना एकशिक्षकी शाळा या दोन शिक्षकी शाळा होतील याची काळजी घेण्यात येणार आहे.
एकशिक्षकी शाळांत एकाच शिक्षकाला पहिली ते चौथीपर्यंतचे सर्व चारही वर्ग घ्यावे लागतात. एकाच वेळी चार वर्गांवर लक्ष देणे हे शक्य नसल्यामुळे अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे कमी विद्यार्थी असलेल्या शाळांचे विलिनीकरण करून त्या शाळेत दोन शिक्षक देण्याची योजना शिक्षण खात्याने बनविली होती. ही योजना शेवटपर्यंत योजनाच राहिली असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही. परंतु नव्याने भरती केलेले शिक्षक या शाळांना मिळणार असल्यामुळे ही समस्या तूर्त सुटली आहे.