आता लढाई गोल्फ कोर्स, कचरा प्रकल्पाविरुद्ध
By Admin | Updated: December 28, 2014 09:38 IST2014-12-28T09:31:27+5:302014-12-28T09:38:27+5:30
आल्वारिस : सर्व शक्ती पणाला लावणार

आता लढाई गोल्फ कोर्स, कचरा प्रकल्पाविरुद्ध
पणजी : राज्यातील बेकायदा खाण व्यवसायाविरुद्ध लढलेले गोवा फाउंडेशन संस्थेचे संचालक डॉ. क्लॉड आल्वारिस यांनी आता तेरेखोल येथील गोल्फ कोर्स आणि सरकारचे नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्प याविरुद्ध लढाई तीव्र करण्याचे ठरविले आहे. खाणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी कधी सुरू होईल याची शाश्वती नसल्याने क्लॉड यांनी सारी शक्ती व युक्ती आता गोल्फ कोर्स व कचरा प्रकल्पाविरुद्धच्या लढ्यासाठी पणास लावली आहे.
तेरेखोल येथील नियोजित गोल्फ कोर्स हा कुळांच्या जमिनीमध्ये उभा राहत असल्याचा आल्वारिस यांचा दावा आहे. ते राष्ट्रीय हरित लवादाकडेही गेले आहेत. गोल्फ कोर्स तसेच तेरेखोल पूल याविरुद्धची आपली लढाई आल्वारिस यांनी यापुढे तीव्र करण्याचे ठरविले आहे.
कळंगुट-साळगावच्या पट्ट्यात व काकोडा येथे सरकार शेकडो कोटी रुपयांचे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभे करू पाहत आहे. त्यापैकी साळगावच्या प्रकल्पाच्या विषयाचा आल्वारिस यांनी अभ्यास केला आहे. हा विषय गंभीरपणे घेऊन निविदा प्रक्रिया व एकूणच कचरा प्रकल्प याविरुद्ध लढण्याची प्रक्रिया आल्वारिस यांनी सुरू केली आहे.
आल्वारिस यांनी राज्यातील खनिज लिजांच्या नूतनीकरणाविरुद्ध यापूर्वी सर्वोच्च न्यायालयास याचिका सादर केलेली आहे. स्टॅम्प ड्युटी भरलेल्या लिजांच्या नूतनीकरणाबाबत हायकोर्टाने दिलेल्या निवाड्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे; पण तिथे सुनावणी कधी सुरू होईल ते सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. खाण कंपन्यांनी २००७ सालापासून सरकारचा जो महसूल बुडविला त्याच्या वसुलीसाठी आपण हायकोर्टात याचिका सादर करणार असल्याचेही आल्वारिस यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. (खास प्रतिनिधी)