आता भर आयुर्वेद पर्यटनावर

By Admin | Updated: December 29, 2014 01:48 IST2014-12-29T01:42:48+5:302014-12-29T01:48:52+5:30

इंटरनॅशनल टुरिझम मार्टच्या धर्तीवर आठ दिवसांचा मेळावा

Now on Ayurveda tourism | आता भर आयुर्वेद पर्यटनावर

आता भर आयुर्वेद पर्यटनावर

पणजी : पर्यटकांची संख्या रोडावल्याने वेगवेगळ्या माध्यमातून पाहुण्यांना गोव्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न चालले आहेत. आयुर्वेद पर्यटनावर भर देण्यासाठी येत्या एप्रिलमध्ये आठ दिवसांचा मोठा मेळावा गोव्यात घेतला जाईल. त्यासाठी योगगुरू रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर यांनाही निमंत्रित केले जाईल.
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे केंद्रात आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या आयुष खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे या उपक्रमासाठी केंद्राकडून निधी आणणे सोपे जाईल, असे सरकारला वाटते.
या मेळाव्यात जगभरातून लोकांना निमंत्रित केले जाईल. साण्डू फार्मास्युटिकल्स, तसेच अन्य बड्या कंपन्या या मेळाव्यात भाग घेणार असून आयुर्वेदतज्ज्ञ मार्गदर्शन करतील. विदेशात सध्या मेडिकल टुरिझमची टूम आहे. त्याच धर्तीवर आयुर्वेद पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जाईल. भारतातील आयुर्वेदाची महती सातासमुद्रापार आहे. त्यामुळे विदेशी पाहुण्यांकडूनही याला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास परुळेकर यांनी व्यक्त केला.
रशियाचे चलन घसरल्याने रशियन पर्यटकांची संख्या घटलेली आहेच, शिवाय देशी पाहुणेही म्हणावे तसे नाहीत. २0 डिसेंबरनंतर गोवा जसा गजबजायचा तसे दिसत नाही. परुळेकर यांनी हे मान्य करताना गेल्या दोन दिवसांतच काही प्रमाणात पर्यटक आल्याचे सांगितले. सनबर्न, सुपरसोनिक पार्ट्यांमुळे पर्यटकांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली; परंतु ती म्हणावी तशी नाही.
दरवर्षी भरणाऱ्या गोवा इंटरनॅशनल टुरिझम मार्टच्या धर्तीवर आठ दिवसांचा आयुर्वेद मेळावा आयोजित केला जाईल. या निमित्ताने देश-विदेशांतून आठवडाभर पाहुण्यांची येथे वर्दळ राहील आणि पर्यटनाचे इप्सितही साध्य होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now on Ayurveda tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.