भाजप सोडल्याचा कोणताही पश्चात्ताप नाही: लक्ष्मीकांत पार्सेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 13:22 IST2024-12-16T13:21:29+5:302024-12-16T13:22:00+5:30

पाच वर्षांचा एकदाच कार्यकाळ द्या, आणखी एका टर्मनंतर राजकारणात इंटरेस्ट नाही, लोबो किंवा अन्य कोणीही मांद्रेत आले, तर मला राजकीयदृष्ट्या फायदाच

no regrets about leaving bjp said laxmikant parsekar | भाजप सोडल्याचा कोणताही पश्चात्ताप नाही: लक्ष्मीकांत पार्सेकर

भाजप सोडल्याचा कोणताही पश्चात्ताप नाही: लक्ष्मीकांत पार्सेकर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आगामी, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मायकल लोबो किंवा अन्य कोणीही जरी मांद्रे मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी येत असेल, तरी मला राजकीयदृष्ट्या त्याचा फायदाच आहे, असे मत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले. आमदार लोबो मांद्रेत येऊ इच्छित असल्याने भाजपने त्यांना समज द्यायला नको का, असा प्रश्न एका मुलाखतीवेळी केला असता, पार्सेकर म्हणाले की, मी आता भाजपमध्ये नाही. त्यामुळे मी यावर भाष्य करू इच्छित नाही, परंतु एक मात्र खरे की मांद्रे पूर्वीसारख्या मागास राहिलेला नाही. हा मतदारसंघ 'लुक्रेटिव्ह' बनलेला आहे. त्यामुळे मायकलच काय अनेकजण येथे येऊ इच्छितात. ते आले म्हणून काही हरकत नाही. खरेतर विद्यमान आमदाराला ते आव्हान वाटावे. नवे लोक आले तर माझ्या राजकीय भवितव्याला तो फायदाच ठरेल.

पार्सेकर म्हणाले की, मी भाजपमधून बाहेर पडलो असलो, तरी लोकसंपर्क तोडलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत मला ५,८०० मते मिळालेली आहेत आणि ती अपक्ष म्हणून मी मिळवलेली आहेत. त्यामुळे माझी ताकद आहेच आणि मी पराभव झाल्याने झोपूनही राहिलेलो नाही. मतदारसंघामध्ये माझे काम चालूच आहे. शैक्षणिक संस्थेच्या व इतर माध्यमातून मी लोकसंपर्कात आहे.

या जर, तरच्या गोष्टी 

आगामी निवडणुकीत भाजपने ऑफर दिल्यास स्वगृही परतणार का?, असा प्रश्न विचारला असता, पार्सेकर म्हणाले की, भाजपमधून मी बाहेर पडलो असलो, तरी अन्य कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. २०२२ ची निवडणूकसुद्धा अपक्ष म्हणूनच लढवली. या जर आणि तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा पाहू. माझ्या राजकीय वाटचालीबद्दल आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. २०२२ साली मी माझ्यावर अन्याय झाला, म्हणून नाराज होऊन पक्षातून बाहेर पडलो होतो. त्यामुळे जोपर्यंत भाजपच्या वतीने कोणी प्रस्ताव ठेवत नाही, तोपर्यंत मी या विषयावर बोलू शकणार नाही. माझी राजकीय कारकीर्द संपू नये, म्हणून पक्षातून बाहेर पडलो व अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

पाच वर्षांचा एक कार्यकाळ द्या, नंतर मला 'इंटरेस्ट' नाही

पार्सेकर म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना मांदेत अनेक प्रकल्प आणले. काही प्रकल्पांचे काम चालू होते, तर काही प्रस्तावित होते. गेल्या दोन कार्यकाळात मी आमदार नाही. त्यामुळे हे प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे पाच वर्षांचा एक तरी कार्यकाळ पुढे मला मिळावा. मी जी विकासकामे योजलेली आहेत ती पूर्ण करू द्यावीत. त्यानंतर मला निवडणुकीत वगैरे विशेष इंटरेस्ट नाही.'

वायफळ खर्च होतोय...

राज्याच्या डोक्यावर ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या आर्थिक स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते?, असे विचारले असता पार्सेकर म्हणाले की, गोवा लहान राज्य आहे. पण, नको तिथे आर्थिक कपात करून इतर ठिकाणी वायफळ खर्च केला जात आहे. शिक्षणासाठी हवी तेवढी तरतूद केली जात नाही. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची नियमित पदे भरलेली नाहीत. माझ्यासारख्यांची कामे होतात, परंतु अनेक शाळांमध्ये शिक्षकांची नियमित पदे भरली जात नाहीत, हे दुर्दैव आहे.

कारकीर्द संपली असती 

पार्सेकर म्हणाले की, भाजपने तिकीट नाकारल्यानंतर पक्ष सोडण्याचा मी जो निर्णय घेतला, त्याबद्दल आजही मला पश्चाताप नाही. कारण त्यावेळी तिकीट नाकारताना मला 'तुम्ही निवडून येऊ शकणार नाहीत, म्हणून तिकीट देत नाही, असे सांगण्यात आले होते. तेव्हा जर मी पक्षातून बाहेर पडलो नसतो, तर माझ्या राजकीय कारकीर्दीचा तो पूर्णविराम ठरला असता. त्यामुळे त्या निर्णयाबद्दल आजही मला खेद नाही.

अशा गोष्टींपासून दूर 

पर्रीकरांच्यावेळच्या आणि आताच्या नेतृत्वातील फरक सांगताना पार्सेकर म्हणाले की, पर्रीकर यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली. आर्थिक शिस्त तसेच राजकीय शिस्त त्यांच्या कारकिर्दीत होती. आता निवडणूक आली की पार्ष्या, टुर्नामेंट यावर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करणारे नेते आहेत. पर्रीकरांनी आम्हाला नेहमी सांगितले की, असे करू नका. त्यामुळे मी अशा गोष्टींपासून दूर राहिलो.

 

Web Title: no regrets about leaving bjp said laxmikant parsekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.