पुन्हा खातेबदल नाही!
By Admin | Updated: October 6, 2015 01:49 IST2015-10-06T01:49:40+5:302015-10-06T01:49:54+5:30
पणजी : मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी केलेले बदल मंत्री दयानंद मांद्रेकर व एलिना साल्ढाणा यांना मान्य नसले

पुन्हा खातेबदल नाही!
पणजी : मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी केलेले बदल मंत्री दयानंद मांद्रेकर व एलिना साल्ढाणा यांना मान्य नसले, तरी सरकार त्याविषयी ठाम आहे. त्यामुळे दबावासमोर नमून सरकार खात्यांमध्ये आणखी बदल करणार नाही, अशी माहिती मिळाली. दिल्लीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी मुख्यमंत्री पार्सेकर यांची सोमवारी याविषयी चर्चाही झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंत्री मांद्रेकर यांच्याकडील पंचायत खाते काढून ते नवे मंत्री राजेंद्र आर्लेकर यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मंत्री एलिना साल्ढाणा यांच्याकडील वन व पर्यावरण ही खातीही काढून ती आर्लेकर यांना देण्यात आली आहेत. स्वर्गीय माथानी साल्ढाणा यांच्या पत्नी असलेल्या मंत्री एलिना साल्ढाणा यांना तर वन व पर्यावरण ही आपली दोन खाती गेल्याने धक्काच बसला आहे. गोव्याला खास दर्जा दिला जावा म्हणून चळवळ करणाऱ्या एनजीओचे काही कार्यकर्ते सोमवारी मंत्री साल्ढाणा यांना भेटले. मंत्री मांद्रेकर यांनी तर पंचायत खाते गेल्याने सरकारवर शरसंधान चालविले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्र्यांनी माघार घेतलेली नाही. भाजपची कोअर टीमही ठाम आहे. त्यामुळे मांद्रेकर यांना पंचायत खात्याऐवजी त्यांना दिलेले पुरातत्व खाते स्वीकारावे लागेल. मंत्री साल्ढाणा यांच्यासमोरही पर्याय नाही व आर्लेकरही त्यांना मिळालेली खाती स्वीकारतील.
मंत्री नाराज झाले, तरी मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप केल्याने आता त्यात काही बदल होणार नाही, असे पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
दरम्यान, रात्री खात्यांची अधिसूचनाही सरकारने जारी केली. राजेंद्र आर्लेकर हे मंगळवारी आपल्या खात्यांचा ताबा स्वीकारतील. (खास प्रतिनिधी)