वरुणापुरी जंक्शनजवळ वास्को पोलिसांची नवीन चौकी, आमदार कृष्णा साळकरांची माहिती
By पंकज शेट्ये | Updated: December 13, 2023 17:55 IST2023-12-13T17:55:17+5:302023-12-13T17:55:44+5:30
मांगोरहील, वरुणापुरी, शांतीनगर इत्यादी भागात अनेकदा सुरक्षेच्या दृष्टीने समस्या निर्माण होतात.

वरुणापुरी जंक्शनजवळ वास्को पोलिसांची नवीन चौकी, आमदार कृष्णा साळकरांची माहिती
वास्को : वरुणापुरी, मांगोरहील, शांतीनगर, इत्यादी भागात कायदा सुव्यवस्था आणखी चांगली व्हावी, लोकांना सुरक्षा मिळावी या दृष्टीने तेथे पोलीस चौकी (पोलीस आऊट पोस्ट) स्थापित करण्याचे निश्चित केले आहे. पुढच्या एका महिन्यात वरुणापुरी जंक्शन जवळील परिसरात पोलीस चौकीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उभारून तेथे नवीन पोलीस चौकी स्थापित केली जाणार असल्याची माहिती वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दिली.
मांगोरहील, वरुणापुरी, शांतीनगर इत्यादी भागात अनेकदा सुरक्षेच्या दृष्टीने समस्या निर्माण होतात. तसेच वरुणापूरी महामार्गावर अनेकदा अपघात इत्यादी घटना घडतात. सुरक्षेच्या दृष्टीने काही समस्या घडल्यास अथवा अपघात घडल्यास वास्को पोलीस स्थानक दूर असल्याने पोलिसांना तेथे पोचण्यास थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी, कायदा सुव्यवस्था आणखीन चांगला करण्यासाठी, अपघात घडल्यास पोलीस त्वरित घटनास्थळी पोचावे यासाठी वरुणापूरी जंक्शन जवळ वास्को पोलीस स्थानकाची नवीन चौकी स्थापित करण्याचे आमदार कृष्णा साळकर यांनी ठरविले आहे.
बुधवारी (दि.१३) आमदार कृष्णा साळकर यांच्यासहीत वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक, वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर, नगरसेविका श्रद्धा महाले इत्यादींनी जेथे पोलीस चौकी स्थापीत करण्याचा विचार आहे त्या परिसराची पाहणी केली. पोलीस चौकीसाठी काय काय साधन सुविधा लागणार त्यावर पहाणीवेळी चर्चा करून त्या लवकरात लवकर उभारून देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार साळकर यांनी शांतीनगर, मांगोरहील, वरुणापुरी, नवेवाडे इत्यादी भागातील लोकांच्या हीतासाठी वरुणापूरी जंक्शन जवळ नवीन पोलीस चौकी स्थापित करण्याचे निश्चित केल्याची माहीती दिली. एका महिन्यात ह्या ठिकाणी नवीन पोलीस चौकीसाठी लागणाऱ्या सर्व साधनसुविधा उभारून पोलीस चौकीचे उद्घाटन केले जाणार असल्याचे साळकर यांनी सांगितले.
लोकांच्या हितासाठी पार्कींग सुविधा लवकरच उपलब्ध करू: आमदार कृष्णा साळकर
वरुणापूरी महामार्गाच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना त्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने ते महामार्गाच्या बाजूला वाहने उभी करतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याबरोबरच महामार्गाच्या बाजूला अयोग्य पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्यांना काहीवेळा पोलीसांना दंड भरावा लागतो. वरुणापूरी महामार्गाच्या बाजूला एक मोठी खुली जागा असून तेथे ह्या परिसरात राहणाऱ्या लोकांना वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहीती आमदार साळकर यांनी दिली. वरुणापूरी महामार्गाच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना त्या खुल्या जागेत वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर लोक महामार्गाच्या बाजूला वाहने उभी करणार नाहीत. त्यामुळे महामार्गाच्या बाजूला वाहने उभी केली जात असल्याने निर्माण होणारा अपघाताचा धोका दूर होण्याबरोबरच तेथील लोकांना पोलीसांना दंड भरावा लागणार असल्याची चिंताही राहणार नाही असे साळकर म्हणाले.