नवा मांडवी पूल दुरुस्ती लांबणीवर; 'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 13:37 IST2025-03-03T13:35:52+5:302025-03-03T13:37:16+5:30
'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने बांधकाम खात्याने हा निर्णय घेतला आहे.

नवा मांडवी पूल दुरुस्ती लांबणीवर; 'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नवा मांडवी पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याची तारीख दहावीच्या परीक्षेमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. परीक्षा संपल्यावर, १८ मार्चपासून केवळ चार ते पाच दिवसच पूल बंद राहील. 'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने बांधकाम खात्याने हा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध करून २ ते १० मार्च याकाळात पूल बंद ठेवल्यास परीक्षार्थी, पालकांचे कसे हाल होतील, याकडे लक्ष वेधले होते. सध्या कार्निव्हल सुरू असून, मिरवणुकांतही अडचणी आल्या असत्या.
'लोकमत'ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दहावीची परीक्षा संपेपर्यंत पूल बंद ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पूल बंदची तारीख पुढे ढकलण्यात आली.
काय घडले असते?
परीक्षेच्या काळात पूल बंद राहिला असता तर विद्यार्थ्यांचे हाल झाले असते. जुन्या पुलावर एखादा अपघात घडला असता तर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असती. दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या पुलाची भारवाहक क्षमता १२ टनांपेक्षा कमी वाहनांची आहे. त्यामुळे पर्वरीहून पणजीकडे येणारी १२ टनांपेक्षा अधिक वजनाची सर्व वाहने अटल सेतूवरून वळवावी लागली असती व मेरशीत वाहतुकीची मोठी कोंडी झाली असती. त्यामुळे पणजी, कुजिरातील शाळांमध्ये परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी अडकले असते. जुना पूल बंद केला, त्यावेळी पंधरा दिवस खास करून दुचाकीस्वारांनी उन्हाचे चटके खात वाहतूक कोंडी सहन केली. आता पुन्हा तसेच घडले असते.
आता १८ मार्चपासून केवळ चार-पाच दिवसच राहणार बंद
बांधकाम खात्याचे विभाग - ७ (राष्ट्रीय महामार्ग) कार्यकारी अभियंता ज्युड कार्व्हलो म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता आम्ही पूल बंदचा सुधारित आदेश काढणार आहोत. १८ पासून केवळ चार ते पाच दिवस पूल बंद राहील.
पालकांनी दिले 'लोकमत'ला धन्यवाद
दरम्यान, सरकारने विधानसभा दोन दिवसांच्या अधिवेशन काळात मंत्री, आमदारांना त्रास नको म्हणून पुलाच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर टाकले होते. भर दहावीच्या परीक्षेच्यावेळी काम काढल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.
शेवटी 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत पूल बंदची तारीख पुढे ढकलल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून 'लोकमत'ला धन्यवाद दिले जात आहेत. तूर्त परीक्षा काळातील अडचणी टळल्या आहेत.