नवे सरकार मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडणार
By Admin | Updated: February 25, 2017 01:56 IST2017-02-25T01:55:19+5:302017-02-25T01:56:33+5:30
पणजी : येत्या महिन्यात मार्चमध्ये नवे सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी

नवे सरकार मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडणार
पणजी : येत्या महिन्यात मार्चमध्ये नवे सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले. अर्थसंकल्प तयार करण्यासाठीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
निवडणूक आचारसंहितेचा काळ असला तरी, मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करावाच लागतो व त्यामुळे अर्थसंकल्प तयार करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या ११ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल व १५ रोजी आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर विधानसभा अधिवेशन पार पडेल व अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.
गेल्या वर्षी एकूण चौदा हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सरकारने तयार केला होता. या वेळी गेल्या जानेवारीपासून सरकार हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीवर ताण येत आहे. वेतनासाठी अर्थसंकल्पात अतिरिक्त तरतूद करावी लागेल. यासाठी माहिती, आकडेवारी व अन्य डेटा गोळा करण्याचे काम सध्या अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकारी करत आहेत. कोणत्या क्षेत्रात कर वाढवावे, कोणत्या योजनांचा समावेश करावा, कोणत्या खात्यासाठी अधिक निधीची तरतूद करावी याबाबतचे निर्णय आता होणार नाहीत. दि. ११ मार्चनंतर जे नवे सरकार अधिकारावर येईल ते सरकार अर्थसंकल्पाला अंतिम रूप देईल. त्या वेळीच सगळे काही ठरेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नव्या लोकनियुक्त सरकारचे जे धोरण असेल त्या धोरणानुसार अर्थसंकल्पातील सगळ्या तरतुदी असतील, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.पार्सेकर यांनी या प्रतिनिधीस सांगितले की, सध्या वरिष्ठ अधिकारी वर्ग अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त आहे.
सध्या काही विधानसभेचे अधिवेशन नाही. मार्चमध्ये अधिवेशन होईल. तत्पूर्वी अर्थसंकल्प तयार होईल. (खास प्रतिनिधी)