गोमंतकीयांसमोर नवे ‘शुल्क’काष्ट
By Admin | Updated: May 12, 2014 01:24 IST2014-05-12T01:24:20+5:302014-05-12T01:24:36+5:30
गोमंतकीयांसमोर नवे ‘शुल्क’काष्ट

गोमंतकीयांसमोर नवे ‘शुल्क’काष्ट
पणजी : परप्रांतातून येणार्या वाहनांना राज्यातील सीमांवर शुल्क भरण्याची सक्ती करण्याचा निर्णय दीड वर्षापूर्वी मोठ्या वादाचा विषय बनल्यानंतर सार्र्वजनिक बांधकाम खात्याने आता गोव्यात नोंदणी झालेल्या वाहनांनाही गोव्याबाहेर जाण्यासाठी शुल्क लागू करण्याचे तत्त्वत: ठरविले आहे. त्याबाबतची मसुदा अधिसूचनाही खात्याने जारी करून वाहनधारकांच्या सूचना व आक्षेप मागविले आहेत. परप्रांतातून जी वाहने गोव्यात येतात त्यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम खाते साधनसुविधा कर आकारते. त्यासाठी सर्व सीमांवर खास नाके उभे करण्यात आले आहेत. गोव्याच्या जवळच्या जिल्ह्यांतून जी वाहने येतात त्यांना करातून वगळण्यात आले आहे. वार्षिक सुमारे तीस कोटी रुपयांचा महसूल बांधकाम खाते साधनसुविधा कराद्वारे प्राप्त करत आहे. राज्यातून गोमंतकीयांची जी वाहने गोव्याबाहेर जातात, त्यांनाही गोव्यात प्रवेश करताना शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव बांधकाम खात्याने आणल्यामुळे त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दुचाकी वगळता अन्य वाहनांना गोव्यात नोंदणी झालेल्या वाहनांकडून कर आकारण्याचा विचार शासकीय पातळीवरून का पुढे आला, हे कुणालाच कळालेले नाही. हा प्रस्ताव वादाचा ठरेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जी वाहने वारंवार गोव्याबाहेर जातात, त्यांना शुल्कात विशेष सवलत द्यावी आणि जी वाहने महिन्याचा पास घेतील, त्यांना ४० टक्के तर जी वाहने तीन महिन्यांचा पास घेतील त्यांना ६० टक्के शुल्क सवलत द्यावी, असेही बांधकाम खात्याने ठरविले आहे. येत्या पंधरा दिवसांत याबाबत लोकांनी आपल्या सूचना व आक्षेप कळविणे गरजेचे आहे. त्यानंतर अंतिम अधिसूचना जारी केली जाणार आहे. गोव्यातून अनेक वाहने परप्रांतात जात असतात, त्यांना शुल्क लावण्यामागील शासकीय हेतूबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. (खास प्रतिनिधी)