पैशांसाठी नेपाळी वेटरकडून पाळोळेत दुसऱ्या वेटरचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 03:12 PM2019-02-12T15:12:52+5:302019-02-12T15:13:11+5:30

पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला पोलिसांकडून अटक : पैशांची गरज असल्याने केला खून

Nepali waiter murder another waiter for money | पैशांसाठी नेपाळी वेटरकडून पाळोळेत दुसऱ्या वेटरचा खून

पैशांसाठी नेपाळी वेटरकडून पाळोळेत दुसऱ्या वेटरचा खून

Next

- सुशांत कुंकळयेकर


मडगाव : पैशांच्या वादावरून आपल्याच सहकाऱ्याचा खून करुन पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या निमा तमंग या मूळ नेपाळी युवकाला अटक केली. या संशयिताने पाळोळे-काणकोण येथे काम करणाऱ्या रणजीत सिंग या ३५ वर्षीय मूळ हिमाचलच्या वेटरचा डोक्यात लाकडी काठी हाणून खून केला.


दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मयत व संशयित एकाच ठिकाणी काम करत होते. संशयित तमंग याला पैशांची गरज होती. तर मयत रणजीत सिंग याच्याकडे पर्यटकांकडून मिळणाऱ्या टिप्समधून सुमारे १२ हजार रुपये जमा झाले होते. याच पैशांवर संशयिताचा डोळा होता. रात्री झोपताना त्याने मयताकडून पैशांची मागणी केली. मात्र, हे पैसे न दिल्याने पहाटेच्यावेळी संशयिताने मयताच्या डोक्यावर लाकडी कांब हाणून त्याला जखमी केले आणि त्याच्याकडे असलेले पैसे घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.


पहाटे ४.३0 च्या दरम्यान पाळोळेच्या त्या रेस्टॉरन्टमधील इतर वेटर जागे झाल्यावर त्यांना रणजीत सिंग याचे विव्हळणे कानावर पडल्याने त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता. त्वरित या प्रकरणाची पोलिसांना खबर देत जखमी रणजीतला काणकोण आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला मडगावात हॉस्पिसियो इस्पितळात हलविण्यात येत असताना वाटेत त्याचे निधन झाले.


दरम्यान, आपल्याला तमांगने मारहाण केली असे रणजीतने आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्यावर पोलिसांनी तमांगच्या फेसबुक पेजवरुन त्याचे फोटो उतरवून घेत सर्व पोलिसांमध्ये ते प्रसारित केले. सकाळी पावणे सातच्या दरम्यान काणकोणहून पेडणेला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसून संशयिताने पळून जाण्याचा बेत केला होता. मात्र, त्याला ही गाडी चुकल्याने बस पकडण्यासाठी तो चावडीच्या दिशेने येत असताना त्याचा शोध घेत असलेल्या पोलिसांच्या तावडीत तो सापडला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी तमांग हा मूळ नेपाळी असला तरी भारतात दार्जिलिंग येथे तो रहात होता. पर्यटन मौसमाच्या दरम्यात मागची नऊ वर्षे तो गोव्यात कामासाठी येत होता. वेटरचे काम करताना त्याने टुरिस्ट गाईड म्हणूनही काम सुरु केले होते. गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना गोवा दर्शन करण्याचे काम तो करत असे अशीही माहिती प्राप्त झाली आहे.

Web Title: Nepali waiter murder another waiter for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.