लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव: नवे कसयले-तिस्क, उसगाव येथे एका बिगर गोमंतकीय दांपत्याने मूल होत नाही म्हणून शेजारीच राहणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून नंतर तिचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे संशयित पती-पत्नीने त्या चिमुरडीचा मृतदेह घरातच पुरलेला होता. क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या या घटनेने संपूर्ण गोवा हादरून गेला असून दोघाही निर्दयी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.
अमैरा जोगदन अनावरे असे त्या चिमुकलीचे नाव आहे. अमैराचे कुटुंबीय रत्नागिरी येथे राहते. चार महिन्यांपूर्वी ती आई व बहिणीसोबत आजीकडे राहण्यासाठी आली होती. या प्रकरणात पप्पू अल्लाट व पूजा अल्लाट (गोकाक-कर्नाटक) या दांपत्याला अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नवे कसयले-तिस्क, उसगाव येथे राहणारी अमैरा बुधवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास आपल्या घरासमोरील रस्त्यावर खेळत होती. तर तिची आई बाबीजान नबीसाब युकूगूत्ती ही तिस्क-उसगाव बाजारात घरगुती सामान आणायला गेली होती.
बराचवेळ अमैराचा आवाज न आल्याने दुपारी १ च्या सुमारास तिची आजी घराबाहेर आली व अमैरा दिसत नसल्याचे पाहून हाका मारू लागली. आजीने अमैराला हाका मारत आराडाओरड करण्यास सुरुवात केली असता वाड्यावरील लोक जमा झाले. त्यानंतर सर्वांनी अमैराचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ती कुठेच सापडली नसल्याने कोणीतरी तिचे अपहरण केल्याचा संशय लोकांनी व्यक्त केला. त्यानंतर अमैरा हिच्या आईने तिस्क उसगाव पोलिस ठाण्यात धाव घेत मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली.
बाजारातून आलेल्या बाबीजान हिला अमैराबद्दल समजताच तिने थेट तिस्क-उसगाव पोलिस ठाणे गाठले व मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंद केली. आपल्या चिमुरडीच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळताच अमैराच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
काल, गुरुवारी सकाळपासून पुन्हा वाड्यावरील लोक अमैराचा शोध घेत होते. तर दुसरीकडे पोलिसांकडूनही तपास सुरू होता. त्याचवेळी वाड्यावर असणाऱ्या एका दुकानात संशयित पूजा अल्लाट गेली व तेथील महिलेशी बोलत असताना त्या दुकानादार महिलेला पूजाचा संशय आला. तिने तत्काळ आपल्या पोलिस पतीला तिच्याबद्दल महिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पप्पू अल्लाट याच्या घरात शिरून तपासणी केली असता अमैराचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह
नवे कसयले वाड्यावर बुधवारपासून भयाण शांतता परसली होती. त्याचवेळी पप्पू व पूजा अमैराचा मृतदेह घरात लपवून होते. पूजाच्या बोलण्यातील गोंधळामुळे त्यांचे बिंग फुटले. ज्यावेळी पोलिस अल्लाट दांपत्याच्या घरात शिरले तेव्हा घरात एका बाजूला अमैराचा मृतदेह अर्धवट स्थितीत पुरलेल्या अवस्थेत दिसतातच पोलिसही हादरून गेले.
पप्पूने चॉकलेट दिले
मूल होण्यासाठी निर्दयतेचा कळस गाठणाऱ्या अल्लाट दांपत्याने अमैराचा बळी देण्याची योजना आधीच आखून ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार पप्पू हा बुधवारी दुपारी अमैरासाठी चॉकलेट घेऊन आला होता. त्यानंतरच अमैरा गायब झाली. अमैराच्या घरापासून अवघ्या ४० मीटर अंतरावर हे अल्लाट दांपत्याचे घर आहे.
अल्लाट दांपत्य दारात बसून होते
अमैरा गायब झाल्याचे आई बाबीजान हिला समजताच तिने आक्रोश करत अमैराला हाक मरत वाड्यावर शोधाशोध सुरू केली. तिच्या समवेत वाड्यावरील इतर लोकही अमैराचा शोध घेत होते. मात्र, त्यावेळी पप्पू व पूजा हे दोघेही आपल्या घराबाहेर बसून हे सर्व पाहात होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही भाव दिसत नव्हते.
असा आला पूजावर संशय...
पूजा वाड्यावरील एका दुकानात उसाचा रस आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्या दुकानातील महिलेशी बोलताना पूजा म्हणाल की, 'आमच्या घरात देवकार्य केले आहे. त्यामुळे पुढचे १६ दिवस तरी मी उसाचा रसच नेणार आहे. त्यात घरात वास येत असल्यामुळे जेवण बनविणार नाही', असे त्या दुकानादार महिलेला सांगितले. पूजा हिला मूल नसल्यामुळे ते दोघे पती-पत्नी नेहमी काहीना काही देवकार्य करत असल्याचे वाड्यावरील सर्वांना महिती आहे. पूजाचे बोलणे त्या दुकानादार महिलेने हेरले आणि तिला संशय आला. तिने आपल्या पोलिस पतीला याबाबत सांगितले आणि प्रकरण उघडकीस आले.