कोरोना व्हायरसबाबत ‘त्या’ रुग्णाची चाचणी निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 21:13 IST2020-01-31T21:13:30+5:302020-01-31T21:13:34+5:30
गोव्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण म्हणून ज्या विदेशी नागरिकाला गोमेकॉच्या स्वतंत्र वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते,

कोरोना व्हायरसबाबत ‘त्या’ रुग्णाची चाचणी निगेटिव्ह
पणजी : गोव्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण म्हणून ज्या विदेशी नागरिकाला गोमेकॉच्या स्वतंत्र वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते, त्याच्या घशातील लाळेचे तसेच अन्य तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुस्कारा सोडला आहे. मंगळवारी २८ रोजी या रुग्णाला घसा खवखवणे व ताप आल्याने संशयित म्हणून गोमेकॉत हलविण्यात आले होते. त्याच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेकडे पाठवले होते. या संशयित रुग्णाला गेले चार दिवस गोमेकॉत ठेवले होते. हा संशयित रुग्ण सात दिवसांपूर्वी चीनहून दिल्लीमार्गे गोव्यात आला होता.
गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले की, ‘ पुणे येथील संस्थेकडून अहवाल प्राप्त झालेला आहे आणि चाचण्या निगेटिव्ह आलेल्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या संशयित रुग्णाला आता डिस्चार्ज दिला जाईल.
सहा जण निगराणीखाली
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा ट्रॅव्हलर (प्रवासी) कोरोना व्हायरसबाबत निगराणीखाली आहेत. यापैकी एकालाच गोमेकॉत दाखल केलेले आहे. इतर पाच जणांची दररोज तपासणी करून काळजी घेतली जात आहे. या पाच जणांमध्ये संशयित रुग्णाच्या पत्नीचाही समावेश आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, गोवा पर्यटनस्थळ असल्याने येथेही या व्हायरसबाबत भीती व्यक्त होत आहे. दाबोळी विमानतळावर थर्मल स्कॅनर बसविण्याची विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी गोमेकॉत स्वतंत्र वॉर्डमध्ये ३0 खाटांची सोय केली असून, चिखली येथे कॉटेज इस्पितळात ७ खाटा उपलब्ध केल्या आहेत.