लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : बिहारमध्ये नितीश कुमार व टीमचे एनडीए सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. जंगल राज्य संपून विकसित बिहार साकार करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना यश आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
बिहार राज्याची निवडणूक ऑक्टोबरमध्ये घोषित होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी एनडीएचे सरकार पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार आहे. राहुल गांधी व त्यांच्या टीमने कितीही खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, तरी आज जंगलराज्य संपून त्या ठिकाणी सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळाल्याने संपूर्ण जनता पाठीशी खंबीर उभी आहे. त्यामुळे पूर्ण बहुमताने एनडीए सरकारला विजय प्राप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
साखळी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण बिहारमध्ये निवडणूक पूर्व प्रचारांतर्गत पटना व दरभंगा येथे दोन संमेलनामध्ये युवा व इतर लोकांना संबोधित केले. त्या ठिकाणी जो विकास झालेला आहे, तो फार मोठा असून पूर्णपणे चेहरामोहरा बदलून देणारा ठरलेला आहे. त्यामुळे पूर्णपणे जनता भाजपबरोबर असून, कोणी कितीही प्रचार खोटा केला, तरी पूर्ण बहुमताचे सरकार त्या ठिकाणी येणार, याची शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काणकोणकर हल्लाप्रकरणी कुणाचीही खैर नाही
दरम्यान, गोव्यातील काणकोणकर यांच्यावरील हल्लाप्रकरणी कुणाचीही खैर करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना दिला. कोण कुठेही असू दे, त्याचा शोध घेऊन पूर्णपणे कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकार कटाक्षाने लक्ष ठेवून असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.