राष्ट्रवादीची दारे चर्चिल यांना बंद!
By Admin | Updated: December 25, 2015 02:01 IST2015-12-25T02:01:35+5:302015-12-25T02:01:53+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीची दारे चर्चिल यांना बंद!
राजू नायक ल्ल पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. पुणे येथे आज शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार घडवून आणला गेला. याच दरम्यान त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकांशी वार्तालाप केला. त्यानंतर ‘लोकमत’च्या गोव्याच्या संपादकांशी बोलताना त्यांनी चर्चिल आलेमाव यांना पक्षात घेण्यास आपण स्वत:च अनुकूल नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
‘‘चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा प्रकट केली आहे. त्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली. मात्र, त्यांना पक्षात प्रवेश देण्याची माझी इच्छा नाही. त्यांचे नावही खराब आहे!’’ अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आलेमाव यांनी पक्षप्रवेशासंदर्भात राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांशीही बोलणी चालविली आहेत. मात्र, या संदर्भात पक्षपातळीवर चर्चा झालेली नसून कोणताही अधिकृत निर्णय घेतला नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
आलेमाव यांना पुन्हा पक्षात घेण्यास काँग्रेसने असमर्थता दर्शवल्यानंतर आलेमावनी इतर पक्षांचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसमधील असंतुष्टांना आपल्या झेंड्याखाली आणण्याचे प्रयत्न अनेक वर्षे राष्ट्रवादीने चालवले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत चर्चिल आलेमाव यांच्यासह त्यांच्या चार कुटुंबीयांनी विविध मतदारसंघांतून लढत दिली होती. त्यांचे पुतणे युरी आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर सांगे मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र, त्या वेळी घराणेशाहीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या मतदाराने आलेमाव परिवारातील चारही उमेदवारांचे पानिपत करत त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. हा सगळा इतिहास ज्ञात असलेले शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आलेमाव यांना प्रवेश देण्यास अनुकूल नाही. मात्र, दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनीच आलेमाव यांना राष्ट्रवादीची दिशा दाखवल्याची वदंता आहे. आलेमाव यांना दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी आणि त्यायोगे नावेली मतदारसंघातून विधानसभेत पुनर्प्रवेश करण्याच्या आपल्या प्रयत्नांना आलेमाव यांचा पाठिंबा मिळावा यासाठी फालेरो यांचे प्रयत्न चालल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.