राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वळवईकर
By Admin | Updated: April 10, 2015 01:38 IST2015-04-10T01:38:06+5:302015-04-10T01:38:18+5:30
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोवा शाखेच्या अध्यक्षपदी अॅड. सुहास वळवईकर यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी व

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वळवईकर
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोवा शाखेच्या अध्यक्षपदी अॅड. सुहास वळवईकर यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या नियुक्तीमुळे आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
वळवईकर यांचा गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला परिचय नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यात कुठेही नव्हते. अलीकडेच त्यांची गोवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती होत असल्याची चर्चा पसरल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना त्यांची तोंडओळख झाली. वळवईकर हे सर्वोच्च न्यायालयाचे वकील असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्त्याच्या केसीस ते दिल्लीत लढवतात. पक्षाचे कार्यालय चालविण्यासाठी व काम वाढविण्यासाठी खर्च करावा लागतो. तसा खर्च करण्याची वळवईकर यांची तयारी असल्याने त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते.
माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा, ज्येष्ठ नेते देवानंद नाईक, प्रवक्ते ट्रोजन डिमेलो हे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार होते; पण पक्षाचे निरीक्षक भास्कर जाधव, समन्वयक प्रफुल्ल हेदे आदींनी वळवईकर यांचीच नियुक्ती करणे योग्य समजले. यामुळे पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी आपल्याला डावलले गेले, अशी भावना गेली काही वर्षे पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची तीन वर्षांपूर्वीच शकले उडालेली असून विधानसभेत या पक्षाचा एकही आमदार नाही. गोव्यात लोकसभा व जिल्हा पंचायत निवडणुकाही या पक्षाने लढविल्या नाहीत.(खास प्रतिनिधी)