तौसिफच्या रूपाने मुस्लिम
By Admin | Updated: August 9, 2014 01:24 IST2014-08-09T01:21:56+5:302014-08-09T01:24:27+5:30
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव एरव्ही तियात्र हा प्रकार प्रामुख्याने ख्रिस्ती वर्गात पाहिला जातो आणि त्यात काम करणारे बहुतेक कलाकार ख्रिस्तीच असतात. मात्र, यालाही काही

तौसिफच्या रूपाने मुस्लिम
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव
एरव्ही तियात्र हा प्रकार प्रामुख्याने ख्रिस्ती वर्गात पाहिला जातो आणि त्यात काम करणारे बहुतेक कलाकार ख्रिस्तीच असतात. मात्र, यालाही काही अपवाद म्हणजे अनिलकुमार, कॉमेडियन आंबे, प्रेमानंद सांगोडकर, प्रेमानंद लोटलीकर आदी हिंदू कलाकार. आजपर्यंत तियात्राच्या वाटेला कुठलाही मुस्लिम कलाकार गेला नव्हता. मात्र, नावेलीतील तौसिफ शेख या युवकाने मागची पाच वर्षे तियात्रात आपली मुशाफिरी चालू ठेवून मुस्लिमही तियात्र करण्यात मागे नाहीत हे दाखवून दिले.
प्रमोद मुतालिक यांच्यावर आधारित असलेला ‘आकांतवाद गोंयांत नाका’ या तियात्रामुळे तौसिफ द नावेली या नावाने परिचित असलेले तौसिफ शेख हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. मागच्या वर्षी याच तौसिफची ‘आमी सोगले एक’ ही कोकणी ध्वनिफीत गाजली होती. या ध्वनिफितीवर दिगंबर कामत आणि मनोहर पर्रीकर यांचे छायाचित्र होते आणि हे दोन्ही एकाच माळेचे मणी हे सांगण्याचा या ध्वनिफितीतून प्रयत्न झाला होता. ही ध्वनिफीत एवढी लोकप्रिय झाली होती की एका आठवड्यातच तिच्या ५४७७ प्रती खपल्या होत्या.
तौसिफ हा जरी मुस्लिम असला तरी त्याचे सर्व बालपण ख्रिस्ती मित्राबरोबरच गेले. या संगतीमुळेच आपण तियात्रात आलो, असे तौसिफ सांगतात. काही वर्षांपूर्वी दादा द मनोरा या तियात्रिस्ताच्या कार्निव्हलच्या खेळात तौसिफ काम करायचा. मात्र, २0११ पासून त्याने स्वत:चे तियात्र लिहून दिग्दर्शित करून रंगमंचावर आणण्यास सुरुवात केली. ‘गोंयचें निसोंटाण’ हा त्याचा पहिला तियात्र. त्यानंतर ‘गिरेस्तकाय’, ‘भिरांकूळ दुयेस’ हेही त्याचे तियात्र गाजले.
त्यांच्या तियात्रांत काहीवेळा राजकीय भाष्यही येत असते. मात्र, सामाजिक संदेश देणे याला आपण प्राधान्य देतो, असे तौसिफ म्हणतात. मागच्या कार्निव्हलमध्ये तौसिफने ‘खूंय न्हिदला सोरकार’, ‘घांटी खंयचो भाटकार’ व ‘विसल्लो ताणे केलेले उपकार’ या तीन ‘पार्ती’ सादर केल्या होत्या. त्यातली खूंय न्हिदला सरकार हे पार्त वास्कोत शाळकरी मुलीवर झालेला बलात्कार आणि गोव्यात व देशात एकूणच होणारे बलात्कार यांच्यावर आधारित होती.
तौसिफच्या व्यतिरिक्त कोकणी तियात्रांत शेख आमीर या आणखी एक मुस्लिम कलाकाराचे नाव गाजत आहे. गाजलेले दिवंगत तियात्रिस्त एम. बॉयर यांचा हुबेहूब आवाज काढून ते तियात्रात गाणी म्हणतात. त्यामुळे त्यांनाही लोकप्रियता मिळाली आहे.