मुस्लिम कुटुंबाने केले मंदिरासाठी भूदान!

By Admin | Updated: June 23, 2014 01:37 IST2014-06-23T01:31:12+5:302014-06-23T01:37:41+5:30

धार्मिक एकोप्याचा आदर्श : दातृत्वातून भक्तिभावाची प्रचीती

Muslim family has made Bhoodan for the temple! | मुस्लिम कुटुंबाने केले मंदिरासाठी भूदान!

मुस्लिम कुटुंबाने केले मंदिरासाठी भूदान!

सुशांत कुंकळयेकर-मडगाव  - गोव्यातील एका मुस्लिम कुटुंबाने स्वमालकीची जमीन सिद्धिविनायक मंदिराला दान करून धार्मिक एकोप्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात २00४ साली एक आगळा आदर्श घालून दिला होता. कुंकळ्ळी या एका छोट्याशा गावातील शेख कुटुंबीयांच्या हृदयात या भूदानाबद्दल दातृत्वापेक्षा भक्तिभावच अधिक आहे.
कुंकळ्ळी गाव पणजीपासून ५0 कि.मी. अंतरावर असून, पायराबांद येथे हे सिद्धिविनायक मंदिर आहे. सुरुवातीला हे मंदिर लहान होते. मात्र, ज्या वेळी या मंदिराचा विस्तार हाती घेण्यात आला, त्या वेळी कुंकळ्ळी येथील शेख अब्दुल रेहमान यांच्या मालकीची जागा मंदिर समितीने मागितली. क्षणाचाही विलंब न करता रेहमान यांनी ही मागणी मान्य केली, असे मंदिर समितीचे माजी अध्यक्ष शिवदास नाईक यांनी सांगितले.
कुंकळ्ळी गाव पूर्वापार धार्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध असून, पोर्तुगीज काळात बाटाबाटीच्या वेळी ख्रिस्ती झालेल्या या गावातील लोक अजूनही आपले मूळ विसरलेले नाहीत. यामुळेच गावाची देवी असलेल्या शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणच्या जत्रोत्सवाला हिंदंूप्रमाणेच ख्रिश्चनही मोठ्या प्रमाणात जातात. या देवीच्या छत्रोत्सवावेळी जी पालखी निघते त्या पालखीला खांदा देण्याचा मान येथील मूळ हिंदू; पण नंतर ख्रिस्ती झालेल्या बांधवांना आहे. गावातील ख्रिस्ती बांधव ‘देवीच्या मागणी’चा मोठ्या अभिमानाने उल्लेख करतात.
वास्तविक हे शेख कुटुंब फारसे धनिक नाही. शेख अब्दुल रेहमान यांचा प्रवासी वाहने भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. रेहमान यांनी जमीन मंदिरासाठी दान देण्याचे ठरविल्यानंतर त्याबाबत मुलांनाही सांगितले होते. त्यांच्या निधनानंतर मुलांनीही वडिलांच्या इच्छेला मान देऊन जमीन मंदिर समितीच्या हवाली केली.
रेहमान यांची पत्नी आएशाबी, मुले शेख शरफुद्दिन, शेख अन्वर व शेख अब्दुल रजाक यांनी त्यांच्या मालकीची २00 चौ. मी. जमीन रेहमान यांच्या स्मरणार्थ दान केल्याची नोंद मंदिरात आहे.

Web Title: Muslim family has made Bhoodan for the temple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.