संगीतामुळे मनःशांती लाभते: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 08:18 IST2025-02-26T08:17:52+5:302025-02-26T08:18:41+5:30
धोंडू नाईक स्मृती संगीत सोहळा उत्साहात

संगीतामुळे मनःशांती लाभते: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : शास्त्रीय संगीतामुळे माणसाला मनःशांती लाभते आणि बुद्धीत वाढ होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले. हरवळे येथील राधाकृष्ण संगीत अकादमी आणि कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेराव्या धोंडू भिकू नाईक स्मृती संगीत सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर हरवळेचे सरपंच गौरवी नाईक, उद्योजक शिवदास गावस, चंद्रकांत नारुलकर, रितेश नाईक, नरेश दातये, अकादमीचे अध्यक्ष प्रा. संतोष मळीक, सचिव दत्ताराम माडकर, कोषाध्यक्ष अनिल जल्मी, संस्थापक रामचंद्र नाईक, राज मडगावकर, शाम फातर्पेकर उपस्थित होते. अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला इशस्तवन सादर केले. त्यांना हार्मोनियम साथ स्मितल मळीक, तर तबलासाथ वृषांग माडकर यांनी साथ केली. उपस्थित मान्यवरांचे आभार अकादमीचे अध्यक्ष मळीक यांनी मानले.
पं. सुधाकर देवळे यांच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनी आपल्या गायनाला राग प्रताप बरलिने सुरुवात केली. नंतर राग बसंती केदार सादर केला. सर्वात्मका सर्वेश्वरा ही भैरवी सादर केली. त्यांना रागिणी देवळे यांनी गायन साथ केली. हार्मोनियम साथ दत्तराज म्हाळशी व तबला साथ पं. अविनाश पाटील यांनी केली. सूत्रसंचालन संजय सालेलकर यांनी केले. ध्वनी संकलन राज मडगावकर यांचे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकादमीचे विद्यार्थी, पालक आणि शिवानंद खेडेकर यांचे सहकार्य लाभले.
पहिल्या सत्रात गायन
सकाळच्या सत्रामध्ये गुरुदास गावकर यांचे गायन झाले. त्यांनी राग अल्हैया बिलावल सादर केला. त्यांना हार्मोनियम साथ अमोल गावस यांनी, तर तबलासाथ गोविंद गावस यांनी दिली. तानपुरा साथ अरुणदत्त परब व अनिकेत नाईक यांनी केली. त्यानंतर अमर मोपकर यांचे एकल तबला वादन झाले. त्यांना नगमा साथ उपेंद्र साळगावकर यांनी केली. नंतर पं. चंद्रकात नाईक यांचे गायन झाले. नाट्यगीताने सांगता केली.
अनुजा-अनुष्का यांचे सहगायन
दुपारच्या सत्रात अनुजा व अनुष्का या नाईक भगिनींचे सहगायन झाले. त्यांनी राग मधुवंतीमध्ये बडा ख्याल, छोटा ख्याल व तराणा सादर केला. त्यांना हार्मोनियम साथ अमोल गावस, तर तबला साथ वासुदेव च्यारी यांनी केली. नंतर दिगंबर गावस यांचे एकल संवादिनी वादन झाले. त्यांनी राग भीमपलास आणि नाट्यगीत सादर केले. त्यांना तबला साथ गौरव गावस यांनी केली. त्यानंतर पुणे येथील रामेश्वर डांगे यांचे गायन झाले. त्यांनी राग मुलतानी आणि शेवटी भजन सादर केले.